करोनाकाळात अंत्यसंस्कार, धार्मिक विधींसाठी पुण्यात ‘गुरुजी ऑन डिमांड’

मुंबई : करोनाचा विळखा वाढत चालल्यामुळे राज्यभरात रुग्णालयांमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे जितके दुरापास्त झाले आहे, तितकेच रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी शास्त्रानुसार पार पाडण्यासाठी नातेवाईकांना विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. अंत्यसंस्काराची महत्त्वपूर्ण बाब करोनाभयामुळे अवघड होत असताना पुण्यातील ‘गुरुजी ऑन डिमांड’ या स्टार्टअपने मोक्षसेवेची संकल्पना रुजवत मृतांच्या नातेवाईकांचा त्रास कमी केला आहे.

या नवउद्योगाने अंत्यविधीच्या परवान्यापासून ते तेराव्याच्या स्वयंपाकापर्यंतचे पॅकेज देऊ केले आहे. सध्या करोनामुळे मृत्यू झालेला असो वा नसो, अंत्ययात्रेसाठीच नव्हे तर अंत्यदर्शनाला नातेवाईक वा शेजारीपाजारी जाण्यास घाबरत आहेत. मुंबई आणि काही महत्त्वाच्या शहर-गावांमध्ये अंत्यविधीसाठी गुरुजी मिळणेही अवघड बनले आहे. या परिस्थितीत पुण्यातील स्टार्टअपकडे गेल्या काही दिवसांत मोक्षसेवेसाठी सर्वाधिक विचारणा होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास विधिवत अंत्यसंस्कार करण्यास परवानगी मिळत नाही. अशांसाठीही या स्टार्टअपकडून पुढील कार्याचे पॅकेज देण्यात येते

मुंबईतील काही धर्मशाळांच्या आसपास वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या धर्मशाळांमध्ये विधीसाठी लागणारे काही पदार्थ, अन्य वस्तू पुरविण्याचा व्यवसाय यापैकी काही रहिवासी मंडळी करतात; परंतु आता करोनाचा संसर्ग तेथेही पोहोचल्यामुळे येथील गुरुजी मंडळींनी धर्मशाळांकडे पाठ फिरविली आहे. तूर्तास हाताला काम नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्याची चिंता त्यांना भेडसावू लागली आहे, तर दुसरीकडे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार व श्राद्धकर्माचे विधी होऊ शकत नसल्यामुळे नातेवाईक निराश होत आहेत; पण गुरुजी मंडळींनी यावरही तोडगा शोधून काढला आहे.

नैसर्गिक संकट कोसळल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पार्थिवावर पहिल्या दिवशी विधीवत अंत्यसंस्कार वा दिवसकार्य करणे शक्य होत नाही. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासून साडेअकरा महिन्यांपूर्वी कधीही श्राद्धकर्माचे विधी करता येतात, असे उमेश रानडे यांनी सांगितले.

करोनामुळे इतर धार्मिक कार्यक्रमांसाठीची मागणी कमी झाली असली तरी काही प्रमाणात तेही सुरू आहेत. त्यासाठी ऑनलाइन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विधी करण्याचा पर्याय या कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. येऊ घातलेले सण, गणपती या पाश्र्वभूमीवरही ऑनलाइन पॅकेज देण्यात आली आहेत. गुरुजी घरी जाऊन कार्यक्रम करणार असतील तर त्यांच्या आणि यजमानांच्या सुरक्षेची आवश्यक काळजी घेण्यात येते, अशी माहिती ‘गुरुजी ऑन डिमांड’चे प्रणव चावरे यांनी दिली.

अंत्यसंस्काराच्या परवानगीपासून तेराव्यापर्यंत 

पुण्यात गेल्या वर्षी ‘गुरुजी ऑन डिमांड’ हे स्टार्टअप सुरू झाले. धार्मिक विधी करणाऱ्या गुरुजींनाही व्यावसायिक दर्जा देण्याचा या स्टार्टअपचा प्रयत्न आहे. सध्याच्या पुणे आणि परिसरातील साठहून अधिक गुरुजी या कंपनीशी जोडले गेले आहेत. सध्या नागरिकांची गरज लक्षात घेऊन ‘मोक्षसेवा’ ही योजना या स्टार्टअपने सुरू केली आहे. मृताच्या अंत्यसंस्कारासाठी परवानगी मिळवणे, मृत्यूचा दाखला मिळवून देणे, अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य, गुरुजी, मृतदेह नेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ (खांदेकरी), रुग्णवाहिका यांपासून ते तेराव्याच्या जेवणाच्या पुरवठा करण्यापर्यंतचे सर्व काही या योजनेत पुरवले जाते.

मुंबईत काय?

मुंबईत स्मशानामध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. गुरुजीही अंत्यसंस्कारासाठी येण्यास नकार देत आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात १०, ११, १२ व्या दिवशीच्या श्राद्धकर्माच्या विधींचे पॅकेजच गुरुजी मंडळींकडून संबंधितांना दिले जात आहे. सर्वसाधारणपणे मुंबईतील काही स्मशानभूमींजवळच्या धर्मशाळांमध्ये श्राद्धकर्माचे विधी उरकलेही जात होते; परंतु संचारबंदीमुळे समुद्रकिनारा, नदी वा तलावकाठ गाठणे संबंधित नातेवाईकांना कठीण झाले आहे.