केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी व एनआयटीच्या पलीकडे जाऊन देशभरातील प्रमुख अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थांमध्ये ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अ‍ॅकॅडमिक नेटवर्क’ची (ग्यान) योजना राबविण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या दोन वर्षांत देशातील १७६ संस्थांमध्ये जगभरातील सातशेहून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी आपले ज्ञानभांडार खुले केले. सध्या माटुंगा येथील व्हीजेटीआयमध्ये ‘बिग डाटा अ‍ॅण्ड ट्रस्ट’ या विषयावर अमेरिकेतील संगणकतज्ज्ञ डॉ. टे.के. प्रसाद यांचे आठवडाभर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू आहे. यामुळे मूलभूत संशोधन व संशोधनाशी निगडित व्यावसायिकतेला चालना मिळणार आहे.

जगभरात रोजच्या रोज ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अभूतपूर्व संशोधन सुरू आहे. इलेट्रॉनिक्स, संगणक तंत्रज्ञानामुळे संशोधनाच्या कामाचा वेगही प्रचंड वाढला आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे संशोधन आणि उत्पादन यांची सांगड घालून अनेक देशांनी विकासाचा वेग वाढवला आहे. ही ‘ग्यान’गंगा भारतातही वेगाने वाहिली पाहिजे यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘आयआयटी’ व ‘एनआयटी’च्या पलीकडे जाऊन देशभरातील प्रमुख अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थांमध्ये ‘ग्यान’ची योजना राबविण्यास सुरुवात केल्यापासून ‘एआयसीटीई’शी संलग्न अभियांत्रिकी संस्था, व्यवस्थापन महाविद्यालये, ‘आयआयएम’, ‘आयआयएससी’ आदी १७६ संस्थांमध्ये सध्या ‘ग्यान’गंगा वाहात आहे. यामागे देशातील उच्च शिक्षणातील अध्यापक व पदव्युत्तर संशोधन करणाऱ्या प्रत्येकाला शिकण्यासाठी परदेशात जाता येत नसल्याने संबंधित क्षेत्रातील जागतिक पातळीवरील तज्ज्ञ संशोधक अध्यापकांना भारतातील संस्थांमध्ये पाचारण करून मार्गदर्शन मिळवणे हा हेतू आहे. यात संबंधित विषयात सध्या जगात सुरू असलेले संशोधन तसेच त्याचा व्यावसायिकतेशी असलेल्या संबंधांवर साधारणपणे एक ते दोन आठवडय़ांचा मार्गदर्शनपर अभ्यासक्रम अथवा कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यासाठी ‘आयआयटी’ खरगपूर यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एखाद्या संस्थेने सुचवलेला परदेशातील संशोधक-अध्यापकांना मान्यता देण्याचे काम आयआयटी खरगपूर करते. २०१४ मध्ये ही ‘ग्यान’ संकल्पना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयआयटी व एनआयटीव्यतिरिक्त अन्य संस्थांमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी देशातील  ६८ संस्थांमध्ये ३८ देशांतील ३५० तज्ज्ञ अध्यापकांनी मार्गदर्शन केले. यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यंदाच्या वर्षी १७६ संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

व्हीजेटीआयने गेल्या वर्षी ‘ग्यान’ उपक्रम राबविण्यासाठी आठ प्रस्ताव पाठवले होते त्यातील सहा प्रस्ताव मंजूर होऊन परदेशातील तज्ज्ञ संशोधकांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.

डॉ. एम. एम. चंदने, ‘ग्यानसमन्वयक, व्हीजेटीआय