आता डिसेंबर २०१५ ऐवजी जून २०१६ चे लक्ष्य
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील सर्वात ‘मागास’ मानल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा थांबण्यासाठी आवश्यक असलेला प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा प्रकल्प पुन्हा एकदा रखडला आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ऑक्टोबर-डिसेंबर २०१५ ही कालमर्यादा ठरवण्यात आली होती. मात्र वडाळा येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा पट्टा अद्यापही रेल्वेच्या ताब्यात न आल्याने आता हा प्रकल्प जून २०१६मध्ये पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अद्यापही हार्बर मार्गावर नऊ डब्यांच्याच गाडय़ा चालवल्या जात आहेत. परिणामी या गाडय़ांमध्ये गर्दी जास्त होते. तसेच या गाडय़ांची संख्याही कमी असल्याने ही गर्दी वाढते. या समस्येवर तोडगा म्हणून हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याचा प्रस्ताव काढण्यात आला होता.
मात्र त्यासाठी हार्बर मार्गावर सध्या नऊ डब्यांच्या गाडय़ांसाठी योग्य असलेल्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची गरज होती. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे एमयुटीपी-२ या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पानुसार मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुर्ला, वडाळा आणि रे रोड आदी स्थानके वगळता इतर सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी १२ डब्यांच्या गाडय़ांसाठी योग्य एवढी वाढवण्यात आली आहे.
मात्र वडाळा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोन-तीन यांची मुंबईच्या बाजूची लांबी वाढवण्यासाठी २४० चौरस मीटरचा एक छोटा तुकडा रेल्वेच्या ताब्यात येण्याची गरज आहे. मात्र तो मिळण्यात अडथळे येत असल्याने वडाळा येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढणे शक्य होत नाही. वडाळा येथे रेल्वेला एक स्टेबलिंग मार्गिकाही तयार करायची असून ती मार्गिका तयार झाल्याशिवाय मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे शक्य नाही.
हे काम पूर्ण होण्यास ऑक्टोबर-डिसेंबर २०१५ ही कालमर्यादा ठरवण्यात आली होती. मात्र या समस्येमुळे ही कालमर्यादा आता जून २०१६पर्यंत वाढवण्यात आल्याचे एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी किमान दहा महिने तरी कायम राहणार आहेत.