उद्धव ठाकरे यांचा इशारा; परराज्यातील कष्टकऱ्यांची पूर्ण काळजी

जीवनावश्यक वस्तू-औषधांची कमतरता नाही व लोकांची गर्दी होऊ नये म्हणून ती दुकानेही २४ तास सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. तरीही विनाकारण काही लोक बाहेर पडत आहेत. पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. करोनाच्या साथीतील आता हा निर्णायक टप्पा असून घरी थांबून सुरक्षित राहा. दुकानांवर गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. परराज्यातील मजुरांनीही प्रवास करू नये. राज्य सरकार त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करत आहे, असेही स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरील थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला. राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, मनसेप्रमुख राज ठाकरे हे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊन काम करत आहोत असे सांगत ठाकरे यांनी त्या सर्वाचे आभार मानले.

‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी-कोविड १९’ या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून उद्योजक उदय कोटक यांनी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.  इतर राज्यांतून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसत आहे. ते जिथे आहेत तेथेच थांबावे. महाराष्ट्र सरकारने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी १६३ केंद्रे सुरू झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवणाची सोय केली आहे. महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यांत अडकले असतील त्यांनी तिथेच राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

चाचणी केद्रांत वाढ : राज्यात चाचणी केंद्रे वाढवली आहेत, त्यामुळे करोनाची बाधा झालेल्यांची संख्या वाढल्याचे दिसेल. विषाणूचा गुणाकार होण्याचा धोका टाळून त्याची वजाबाकी करावयाची असल्याने हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. करोना रुग्णांची संख्या गुणाकाराच्या पद्धतीने वाढणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागतील. बरेच रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ही समाधानाची बाब आहे. खासगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने बंद न करता त्यांच्याकडे येणाऱ्यांवर उपचार करावेत.