मुंबई : नक्षलग्रस्त विभागासह अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरारी पथकातील डॉक्टरांनी मानधनवाढीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.

राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्य़ांतील गावखेडय़ांत, तसेच पाडय़ांवर डॉक्टरांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी १९९५ साली ‘भरारी पथका’ची स्थापना करण्यात आली होती. या पथकात बीएएमएस डॉक्टरांचा समावेश करण्यात येऊन त्यांना एक जीपगाडी, औषधे आणि साहाय्यक देऊन त्यांच्या माध्यमातून पाडय़ा पाडय़ात वैद्यकीय सेवा देण्यात येऊ लागली. यासाठी सुरुवातीला या डॉक्टरांना सोळा हजार रुपये मानधनापोटी देण्यात आले. यात २०१५ मध्ये वाढ करून आरोग्य विभागाकडून १८ हजार तर आदिवासी विभागाकडून ६ हजार असे २४ हजार रुपये मानधन देण्यात येऊ लागले.

आरोग्य विभागाच्या पूर्णवेळ गाडी चालकालाही आजघडीला या डॉक्टरांहून अधिक वेतन मिळत असून नक्षलग्रस्त तसेच दुर्गम आदिवासी भागात काम करणाऱ्या १७३ डॉक्टरांना मात्र अवघ्या २४ हजार रुपये मानधनावर राबावे लागत आहे. भरारी पथकाचे १७३ डॉक्टर दरमहा हजारो रुग्णांवर तसेच स्तनदा माता आणि अंगणवाडय़ांमधील बालकांना तपासून उपचार करतात. आदिवासी विभागाने त्यांचे मानधन वाढवून १८ हजार करावे असा प्रस्ताव आरोग्य विभागाने आदिवासी विभागाला पाठवला असून गेल्या वर्षभरात त्यावर आदिवासी विभागाने निर्णय घेतला नसल्याचे भरारी पथकाच्या डॉक्टरांनी आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : याबाबतचे निवेदन डॉ. शेषराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदिवासी मंत्री पाडवी तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. आरोग्य विभागातील अन्य डॉक्टरांप्रमाणे किमान ५० हजार रुपये मानधनापोटी आम्हाला मिळावे, अशी मागणी या डॉक्टरांनी केली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.