अवाजवी शुल्क आकारून करोना रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या लुटमारीत डॉक्टरांचा सहभाग आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिला. ‘लोकसत्ता विश्लेषण’ उपक्रमांतर्गत वेबसंवादमध्ये त्यांनी राज्यातील करोनास्थितीचा आढावा घेत विविध मुद्दयांवर भाष्य केले.

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून चाचणी प्रयोगशाळा, खाटांची उपलब्धता, साधनसामुग्री, मनुष्यबळ वाढविण्यावर भर देण्यात आला. संसर्गप्रसार रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्याचा रुग्णदुपटीचा कालावधी ३१ दिवसांवर गेल्याचे टोपे यांनी सांगितले. रुग्णसंख्या वाढली तरी चालेल. मात्र, मृत्युदरावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ज्येष्ठ नागरिक आणि जोखमीच्या गटातील नागरिकांच्या आरोग्याचे व्यवस्थापन हे प्राधान्याने करावे, अशा सूचना यंत्रणांना केल्या आहेत. राज्याचा मृत्युदर एक टक्क्यांहून खाली आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

खासगी रुग्णालयांच्या दरावर नियंत्रण आणले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रत्येक रुग्णालयात लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. अवाजवी शुल्कवसुली केल्यास रुग्णांना पैसे परत देणे, दोषी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शुल्कलुटीतील अनेक प्रकरणांत डॉक्टरांचा सहभाग नसून रुग्णालय व्यवस्थापनाचा हात असल्याचे आढळले आहे. मात्र, अशा प्रकरणांत डॉक्टरांचा सहभाग आढळला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्यासाठी राज्याच्या उत्पन्नाच्या केवळ ०.८ टक्के खर्च केला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यादृष्टीने पुढील काळात नक्कीच पावले उचलली जातील, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आरोग्य सेवा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासह पायाभूत सुविधा आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर जागाही वाढविण्यात येतील, असे टोपे यांनी सांगितले.

टाळेबंदी आवश्यक होती

राज्यातील वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक वेळ आणि परिस्थिती टाळेबंदीने मिळवून दिली. त्यामुळे टाळेबंदी नको होती हे म्हणणे योग्य ठरणार नाही, त्यावेळी ती गरज होती, अशा शब्दांत राजेश टोपे यांनी टाळेबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदी जाहीर केली त्यावेळी परप्रांतातील मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी काही वेळ मिळावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली. मात्र सर्वानी आहे त्या ठिकाणीच राहावे, याबाबत पंतप्रधान आग्रही राहिले. मात्र, नंतर मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले, याकडेही टोपे यांनी लक्ष वेधले.

ग्रामीण भागांमध्ये जागरूकता हवी

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात एकाच जागी अडकून पडलेल्या नागरिकांनी, नियम काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर प्रवास केल्यामुळे संसर्ग ग्रामीण भागांमध्येही पोहोचला. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची सतर्कता सर्वात महत्त्वाची आहे. ग्रामीण भागांतील स्थानिक प्रशासन आणि अधिकारी यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. औषधे, पायाभूत सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, आजाराबाबत ग्रामीण भागात जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे.

 ‘आरोग्यसेतू अ‍ॅप’ची सक्ती नाही

टाळेबंदीच्या शिथिलीकरणास सुरूवात झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाने ‘आरोग्यसेतू अ‍ॅप’चा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे काही ठिकाणी या अ‍ॅपची सक्ती केली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ‘आरोग्यसेतू अ‍ॅप’चा वापर करावा ही केवळ सूचना असून, त्याची सक्ती करता येणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

औषधांची चिंता नको

करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांची पुरेशी खरेदी करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात ती उपलब्ध होतील, याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच काळाबाजार होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे औषधांबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

सामूहिक प्रतिकारशक्तीकडे..

देशात करोनाबाबत सामूहिक प्रतिकारशक्तीचा पर्याय अव्यवहार्य ठरेल, भूमिका केंद्रीय आरोग्य विभागाने घेतला आहे. मात्र, मुंबईतील सेरो सर्वेक्षणातून झोपडपट्टीभागांत ५७ टक्के नागरिकांमध्ये करोना विषाणूची प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे आढळले असून, आपला प्रवास सामूहिक प्रतिकारशक्तीकडे होत असल्याचे टोपे यांनी मान्य केले.

इतर ठिकाणचे चित्रही बदलेल

मुंबईत धारावी येथे रुग्णसंख्येने कळस गाठला होता. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली पाहायला मिळाली. पुणे शहर तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्य़ांची रुग्णसंख्या सध्या मोठी दिसत असली तरी पुढील दहा ते पंधरा दिवसांत या भागांतील रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

सतर्क राहणे हाच प्रतिबंध

करोना विषाणू संसर्गाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांनी कंबर कसली. संभाव्य रुग्णवाढ विचारात घेऊन त्याप्रमाणे वैद्यकीय सुविधा उभ्या करण्यात आल्या. मात्र, सतर्क राहणे,  मुखपट्टीचा वापर, अंतर नियम तसेच वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे आणि सार्वजनिक जागी स्वच्छता या बाबी सर्वात महत्वाच्या आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णाने आपल्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्वाचे असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.