शुक्रवारपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे

तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर सक्रिय होणार आहे. गुरुवारपासून विदर्भात, तर शुक्रवारपासून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. शनिवारी संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे.

पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने दोन दिवस मुंबईत पावसाच्या सरींची संख्या वाढली. कोकणात पावसाच्या सरी थांबल्या नसल्या तरी राज्याच्या इतर भागात मात्र तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ पावसाने दर्शन दिले नसल्याने पिके करपली आहेत. सोमवारी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्य़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. २४ तासात कल्याण येथे १३९ मिमी तर अंबरनाथ येथे ९० मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत सांताक्रूझ येथे ५३ मिमी पाऊस पडला.

पर्जन्यभान

आता राज्यात पुन्हा एकदा मोसमी वारे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. पूर्व किनारपट्टीवरून येत असलेल्या मोसमी वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल. पूर्वेला असलेल्या विदर्भात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानंतर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या मध्यम सरींना सुरुवात होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र येथील काही ठिकाणी शुक्रवारी व शनिवारी मुसळधार सरी येतील तर मराठवाडय़ात शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याप्रमाणेच गुजरात व मध्य प्रदेश येथेही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.