मुंबईतील टर्मिनल १ व टर्मिनल २ येथील नियंत्रित प्रवेश मार्ग प्रकल्पाचे भुमिपूजन आज(सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. तसेच, मुंबईला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 2A व मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरूवात झाली आहे. कांदिवलीमधील आकुर्ली स्टेशनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नेृत्वाकडून काहीसा भेदभाव केला जात असल्याचं जाणवत असल्याचं बोलून दाखवलं. तसेच, कितीही संकटं आली तरी राज्याचा विकास थांबणार नसल्याचंही ते म्हणाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ”तौते चक्रीवादळानंतर पंतप्रधान सर्वप्रथम मुंबईत येणार होते, त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. मात्र काही कराणाने पंतप्रधानांचा इकडाचा दौरा रद्द झाला, याचं कारण आम्हाला कळू शकलं नाही. परंतु पंतप्रधान थेट गुजरातला गेले अन् गुजरातची मागणी काही नसताना देखील, खरंतर मागणी ही नंतर होत असते, परंतु तत्काळ त्यांनी १ हजार कोटी जाहीर केले. महाराष्ट्राला जेवढे योग्य वाटतील तेवढे तरी पैसे त्यांनी द्यायला हवे, त्यातही आम्ही समाधानी होवू. कारण, आम्ही सर्वांनी दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निसर्ग चक्रीवादळाचा विचार करून, कोकणवासीयांना मदत करण्याची भूमिका घेतली.”

तसेच, ”माझं एवढच म्हणणं आहे की राज्यकर्ते येत असतात, जात असतात बदल होत असतात. शेवटी जनतेच्या मनात जे असतं जनता त्यांना निवडून देत असते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधून आपण सर्वांनी हे पाहिलं आहे. शेवटी वरच्या ठिकाणी देखील कुणीही राज्यकर्ते असले, मागील काळात मनमोहन सिंग, शरद पवार, पी. चिदंबरम हे काम करत होते, तेव्हा असा भेदभाव कधी होत नव्हता. मात्र तो थोडासा जाणवतो आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे नाही याबाबत सगळ्यांनी नीट विचार करावा, एवढीच माझी निमित्त अपेक्षा आहे.” असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवलं.