गणेशोत्सव मंडळांचा मदतयज्ञ; कलावंतांकडूनही सहाय्य

मुंबई : कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. राज्यातच नव्हे तर आसपासच्या राज्यांमध्ये येणाऱ्या संकटात मदतीचा हात पुढे करणारी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पुन्हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावली असून पूरग्रस्तांसाठी मदतयज्ञ सुरू झाला आहे. मनोरंजन क्षेत्रातील बऱ्याच कलाकारांनी पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत केली असून समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू केला आहे. माटुंगा, किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने महाड आणि चिपळूण येथील काही गावांना भेट देऊन २१ हजार २०० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, एक टन फरसाण, १३ हजार बिस्कीटचे पुडे आदींचे वाटप केले. यासाठी मंडळाचे स्वयंसेवक प्रत्यक्ष तिथे गेले होते. लवकरच या दानयज्ञाची दुसरी फेरी होणार असून त्यात आरोग्य चिकित्सेला महत्त्व दिले जाईल. कारण पुरानंतर अरोग्याच्या समस्या भेडसावतात. निवाऱ्याच्या दृष्टीने चटई, चादरी, कपडेदेखील देण्याचा विचार आहे, असे मंडळाचे विश्वस्त आर. जी. भट यांनी सांगितले.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. या आवाहनासही चांगला प्रतिसाद मिळत आहे. समितीच्या पुढाकाराने कोकण, कोल्हापूर, सांगली  व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर राबवून तसेच औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.  साथीचे रोग, त्वचारोग, महिलांशी संबंधित आजार यावरील मदतीकरिता किमान ८० डॉक्टर व त्यांचे सहाय्यक यांचे वैद्यकीय पथक मंगळवार, २७ जुलै रोजी श्री स्वामी समर्थ मठ, दादर येथून रवाना झाले. यासाठी माऊली चॅरिटेबल अ‍ॅन्ड मेडिकल ट्रस्ट-मुंबई. मातृभूमी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, केशवआळी गणेशोत्सव मंडळ, शिवसह्याद्री फाउंडेशन, मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ, पत्रकार आणि मित्र (अहिल्या विद्यामंदिर माजी विद्यार्थी), आचार्य अत्रे समिती मुंबई, स्व. सौ नयना चौधरी स्तनकर्क संभावना निवारण ट्रस्ट -मुंबई, शेगावचे गजानन महाराज पदयात्री सेवा संस्था, मुंबई-ठाणे आदी संस्था एकत्र आल्या आहेत.

चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानेही मदतीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांसह विभागातील लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने कपडे, सुका खाऊ अशा वस्तू देण्याच्या विचार सुरू आहे. तसेच तेथील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा मानस आहे, असे मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले.

कलाकारांचे समाजभान

पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू राहावा यासाठी आता कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. अभिनेते प्रवीण तरडे, भरत जाधव, हेमंत ढोमे, स्वप्निल जोशी, सुयश टिळक, उमेश कामत, दिग्दर्शक केदार शिंदे, रवी जाधव यांसह अभिनेत्री ऋतुजा देशमुख, ऋतुजा बागवे, सुकन्या मोने, सोनाली खरे, अभिज्ञा भावे, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांकडून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘कोकण हे फक्त सहलीनिमित्ताने फिरण्यासाठी नाही. आज तिथे आपल्या मदतीची खरी गरज आहे. शक्य असेल तितकी मदत करा,’ असे आवाहन भारत जाधव यांनी केले आहे. तर दिग्दर्शक रवी जाधव यांनीही टॉवेल, कपडे, चटई, चादरी यांची मदत पूरग्रस्तापर्यंत पोहोचवली आहे. कोकण प्रांतातील परिस्थिती अत्यंत बिकट असून तिथल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने समाजमाध्यमांचा आधारे मदतीचा मार्ग खुला करून दिला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रसाद ओक यांनीही पुढचे आठ दिवस केवळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजमाध्यमांचा वापर करणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबईतील मंडळांनी कायमच देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीत मोठे योगदान दिले आहे. यंदा मंडळांची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही मंडळे मदतीसाठी पुढे येत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. करोनामुळे  मंडळाचीही आर्थिक स्थिती ठीक नाही. वर्गणी, देणगी, जाहिरात आणि अन्य माध्यमातून येणारा निधी पूर्णत: बंद झाला आहे. तरीही मंडळांनी पुढे येऊन आपापल्या कार्यकर्त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार जी काही मदत करता येईल ती करावी.

– अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती