मुंबई : कर्जावरील मासिक हप्ता भरला नाही म्हणून व्यावसायिकाची छळवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी उच्च न्यायालयाने गुरुवारी मुथ्यूट होम फायनान्स या बिगर बँकिंग कंपनीला नोटीस बजावली. न्यायालयाने पुणे पोलिसांनाही या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

कंपनीचे कर्मचारी आपल्यासह पत्नीलाही धमकावत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांने केला आहे. याचिकाकर्त्यांने या बिगर बँकिंग कंपनीच्या पुणे येथील वाकडेवाडी शाखेतून डिसेंबर २०१६ मध्ये १४ लाख ८६ हजार ५५९ रुपयांचे कर्ज घेतले होते. या रकमेवर वार्षिक १४ टक्के व्याज आकारण्यात आले होते.

आपण प्रतिष्ठित व्यावसायिक आहोत. दोन वर्षे कर्जावरील व्याज नियमितपणे भरत होतो. आपल्याला व्यवयासातून मिळणारा पैसा हा बँकेत जमा होतो. आपल्यासोबत काम करणाऱ्या दुकानदारांकडून पैसे या बँक खात्यात जमा होत होते. मात्र सप्टेंबर २०१९मध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. परिणामी कर्जाचा हप्ता देता आला नाही. त्यानंतर कंपनीकडून  हप्त्यासाठी सारखे फोन यायला लागले व त्यांना  धमकावायला सुरुवात केली, असा आरोप याचिकाकर्त्यांने केला आहे.