दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजे सध्या अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाणारा पूल टाळेबंदीच्या काळात पाडण्यात येईल. त्यामुळे या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक दहा किमी अंतरासाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीस अमृतांजन पूलाचा अडथळा होत असल्यामुळे पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरु होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य झाले नव्हते. करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील वाहनांची संख्या कमी झाली असल्यामुळे ४ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात नियंत्रित स्फोटकांचा वापर करुन हा पूल पाडण्यात येईल. दरम्यान या काळात द्रुतगती मार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गावरुन वळविण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीसांनी जाहीर केले आहे.

फायदा काय?

या पुलाखाली अवजड वाहने अडकून होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून आता सुटका होणार आहे. या मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण पूल तोडल्यानंतर शून्यावर येऊ शकेल.

या कालावधीतील बदल.. या पाडकामामुळे मुंबई ते पुणे मार्गावरील वाहतूक अंडा पॉईन्ट येथून जुन्या महामार्गावरुन खंडाळा-लोणावळा शहरातून लोणावळ एक्झिटपर्यंत होईल, तर पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक लोणावळा एक्झिट येथून जुन्या महामार्गावरुन लोणावळ-खंडाळामार्गे अंडा पॉईन्टपर्यंत वळविण्यात येईल.

ऐतिहासिक ओळख..

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात असलेला अमृतांजन पूल हा काही अभ्यासकांच्या मते बोर घाटाच्या आठवणी प्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. या कमानीच्या मध्यवर्ती खांबावर लावलेल्या संगमरवरी लादीवर याचा उल्लेख आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकीर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचे बांधकाम केले असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे. गेल्या शतकात या पूलाजवळ अमृतांजन या वेदनाशामक बामची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला.