स्वत:च्या मुलीला प्रथम आणण्यासाठी अन्य विद्यार्थ्यांचे गुण कापल्याचा आरोप

शाळेच्या विश्वस्तांच्या मुलीला प्रथम आणण्यासाठी इतर विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्याचा गैरप्रकार अंधेरीतील अशोका अ‍ॅकॅडमीमध्ये घडल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे. इथल्या लोखंडवाला या उच्चभ्रू परिसरातील ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्नित शाळा आहे. या शाळेतून यंदा ४१ विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यापैकी ३० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण चुकीचे छापण्यात आले आहेत. शाळेने जाणीवपूर्वक गुण कमी केल्याचा पालकांचा आरोप आहे.

अशोका अ‍ॅकॅडमीमध्ये वर्षांतून सीबीएसईच्या नियमानुसार तीनवेळा प्रत्येक विषयाचे प्रत्येकी २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन झाले. त्याची गुणपत्रिकाही विद्यार्थ्यांना दिली गेली. नियमानुसार सर्वात जास्त गुण असलेल्या दोन गुणपत्रिकांमधील गुणांची सरासरी दहावीच्या अंतिम निकालासाठी सीबीएसईकडे पाठवली जाते. या वर्षी झालेल्या तिसऱ्या मूल्यमापनाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले नाही. इतर दोन गुणपत्रिकांतील गुणांची सरासरी पाहता अंतिम निकालात देण्यात आलेले अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण निकालावर परिणाम झाला असून  चांगले महाविद्यालय गमवावे लागण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत.

शाळेच्या विश्वस्तांची मुलगीसुद्धा याच शाळेत शिकते. फक्त तिलाच प्रत्येक विषयात २० पैकी २० अंतर्गत गुण मिळाले आहेत. ९६ टक्के मिळवून ही मुलगी शाळेतून पहिली आली. शिवाय शाळेच्या नियमित उपक्रमांमध्येही या मुलीला इतर मुलांपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे विश्वस्तांच्या मुलीला प्रथम आणण्यासाठीच इतर विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्यात आल्याचा आरोप पालक करत आहेत. ६ मे ला निकाल लागताच सर्व पालक तातडीने शाळेत गेले होते. मात्र शाळेला सुट्टी असल्याने मुख्याध्यापकांची भेट होऊ शकली नाही.

पालक मुख्याध्यापिका आणि विश्वस्तांच्या घरी गेले असता त्यांनी भेट नाकारली. त्यानंतर मे च्या शेवटच्या आठवडय़ात पालक पुन्हा शाळेत गेले. सीबीएसईकडे विद्यार्थ्यांचे सुधारित गुण पाठवण्यात आल्याचे शाळेने पालकांना सांगितले. मात्र याविषयी काहीही लेखी देण्यास नकार दिला.

शाळा प्रतिसाद देत नसल्याने १३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. सोमवारी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि विश्वस्त यांनी पोलिसांची भेट घेत सीबीएसईला १४ मे या दिवशी लिहिलेले पत्र सादर केले. तसेच विद्यार्थ्यांचे सुधारित गुण मिळवण्यासाठी स्वत: दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले. मनसे विभागप्रमुख संदेश देसाई यांनी पालकांची बाजू घेत अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.