राष्ट्रवादी पक्षाच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील खात्यात करण्यात आलेल्या २० कोटींच्या रक्कमेचा तपशील दिलेला नसल्याने आयकर खात्याने पक्षाला नोटीस बजाविली आहे. ही रक्कम कार्यकर्त्यांची देणगी तसेच अन्य मार्गाने मिळालेल्या देणग्यांची असून, त्यात गैर काहीही नाही, अशी सारवासारव पक्षाच्या वतीने करण्यात आली. लोकसभा निवडणुकांच्या निकालाला चार दिवस उरले असताना समोर आलेल्या या प्रकरणामागे काँग्रेस नेते व विद्यमान अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.
प्रत्येक राजकीय पक्षांना त्यांना मिळणाऱ्या देणग्यांचा तपशील व अन्य माहिती सादर करावी लागते. राष्ट्रवादीच्या बँक खात्यात ६१ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले. यापैकी ३४ कोटी ७५ लाख रुपये हे रोख स्वरूपात जमा करण्यात आले आहेत. पक्षाच्या वतीने जमा करण्यात आलेल्या २० कोटी ७५ लाख रुपयांच्या रक्कमेचा तपशीलच सादर करण्यात आलेला नाही. २ एप्रिल २०१३ ते १९ एप्रिल २०१४ या काळातील खात्यातील व्यवहारांचा आढावा घेताना या त्रुटी मुंबई आयकर विभागाला आढळून आल्या. परिणामी ही रक्कम बेनामी ठरवीत आयकर विभागाने राष्ट्रवादीला नोटीस बजाविली.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांचे संबंध सर्वश्रुतच आहेत. पवार आणि चिदम्बरम यांचे कधीच जमले नाही. वित्त मंत्री म्हणून पवार यांच्या खात्याला निधी देताना चिदम्बरम हे हात आखडता घेत. त्यामुळे आता विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपता संपता चिदम्बरम यांच्या सांगण्यावरूनची कारवाईची सूत्रे हलली असावीत, असे बोलले जात आहे.

या रकमेबाबत १६ एप्रिलला
आयकर खात्याची नोटीस प्राप्त झाली. कार्यकर्त्यांकडून तसेच सर्वसामान्यांकडून मिळालेल्या देणग्या यातून ही रक्कम जमा झाली. पुढील सुनावणीला प्रत्येक पैचा हिशेब सादर केला जाईल. – नवाब मलिक, पक्षप्रवक्ते