गेल्या वर्षभरापासून मुंबई किनारी परिसरात डॉल्फिन आढळण्याचं  प्रमाण वाढलं आहे. रविवारी वांद्रे-वरळी सी लिंकजवळ पुन्हा एकदा डॉल्फिन्सचं दर्शन झालं आहे.

हम्पबॅक डॉल्फिन प्रजातीतील हे डॉल्फिन्स आहेत. साधरण हम्पबॅक डॉल्फिन्स हे रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग किनाऱ्यानजीक आढळतात. मुंबईतील किनाऱ्यावर त्यांचं दर्शन घडणं तसं दुर्मिळ. मात्र गेल्या वर्षभरापासून  मुंबई किनाऱ्यालगत या डॉल्फिन्सचं दर्शन वारंवार होत असल्याची माहिती स्थानिक मश्चिमारांनी दिली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला ससून डॉकजवळ हम्पबॅक डॉल्फिन्स आढळून आले होते. तर गेल्या वर्षी वर्सोवातही हे डॉल्फिन्स आढळून आल्याची नोंद आहे.  हम्पबॅक डॉल्फिन्स हे उथळ पाण्यात आढळतात. या व्यतिरिक्त गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्ह, हाजी आली, मरिन लाइन्स गिरगाव या किनाऱ्या लगतच्या परिसरातही हम्पबॅक डॉल्फिन्स हे अनेकदा नजरेस पडतात अशी माहितीही कोळी बांधवांनी दिली.

छाया सौजन्य : प्रशांत नाडकर

 

‘डॉल्फिन्स नजरेस पडणं ही आता दुर्मिळ गोष्ट राहिली नाही. गोड्या आणि खाऱ्या पाण्यात डॉल्फिन्स आढळतात. मात्र असं असलं तरी मुंबईच्या किनाऱ्यावर क्वचितच डॉल्फिन्स आढळतात. मुंबईतील समुद्रात गाळ अधिक आढळतो पण हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गाळ किनाऱ्यावरून  वाहून जातो त्यामुळे कदाचित डॉल्फिन्स  मुंबईच्या किनाऱ्यावर येत असतील’ अशी माहिती सीएमएफआरआयचे निवृत्त वैज्ञानिक विनय देशमुख यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.