पत्नीने आत्महत्या करुन जीवन संपवल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी पतीने तसाच गाडीत ठेऊन आठ तास गाडी फिरवत ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती सोकलाराम पुरोहितला (२८) अटक केली आहे. ही घटना सात जूनला घडली.

अंधेरी पूर्वेला साकिनाका येथे राहणारा सोकलाराम रात्री एकच्या सुमारास घरी पोहोचला, तेव्हा त्याने पत्नी मणीबेनला पंख्याला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. पुरोहित मित्राच्या मदतीने पत्नीला रात्री अडीजच्या सुमारास खासगी रुग्णालयात घेऊन गेला. तिथे तपासल्यानंतर डॉक्टरांनी मणीबेनला मृत घोषित केले. त्यांनी पुरोहितला मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

पण पुरोहित दुसऱ्या खासगी रुग्णालयाच्या शोधात फिरत होता. त्यानंतर त्याने त्याच्या समाजाच्या लोकांना फोन केला. त्यांनी पुरोहितला पत्नीचा मृतदेह त्यांच्या समाजातर्फे चालवल्या जात असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. समाजातील लोकांनी डॉक्टरशी चर्चा केली तेव्हा डॉक्टरने मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितला असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० च्या सुमारास पुरोहित पत्नीचा मृतदेह महापालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात घेऊन आला. त्यावेळी डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. मला सरकारी रुग्णालयात पत्नीला घेऊन यायचे नव्हेत. समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयात पत्नीला घेऊन जायचे होते असे पुरोहितने पोलिसांनी सांगितले.

सोकलाराम आणि मणीबेनचे पाचवर्षांपूर्वी लग्न झाले होते. या जोडप्याला मूलबाळ नव्हते. त्यांच्यात सतत भांडणे व्हायची असे तपासातून पोलिसांना समजले. पोलिसांनी आता सोकलारामला त्याला पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.