पर्यावरणमंत्र्यांचे आदेश

मुंबई : कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा बांधून देण्यासाठी प्लास्टिक आढळून आल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय पर्यावरण विभागाने घेतला असून तसे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.

राज्यातील प्लास्टिक बंदीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत कदम यांनी हे आदेश दिले. त्यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील उपस्थित होते. राज्यात ई-कॉमर्सद्वारे होणाऱ्या उत्पादन वितरणासाठी लागणाऱ्या प्लास्टिकला फक्त तीन महिन्याकरिता विक्री करण्यास मुभा दिली होती. ती मुदत संपल्याने बांधणीसाठी प्लास्टिकऐवजी अन्य पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे अपेक्षित आहे.

गुजरात राज्यातून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक येत असून पोलिसांना ट्रक जप्त करुन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लवकरच २५ लाख पिशव्या तयार होत असून त्या बाजारात उपलब्ध होतील असेही कदम यांनी सांगितले.

बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई-रविंद्रन, महानगरपालिकांचे आयुक्त, उपायुक्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिकांचे मुख्यधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पर्यावरण व प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

होणार काय?  जर दुकानात प्लास्टिक आढळले तर दुकानांवर कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. पर्यटन आणि देवस्थानच्या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग मोठय़ा प्रमाणात वापरल्या जातात. तेथेही पोलीस आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार आहे.

गणपती उत्सवाच्या काळात थर्माकोलवर शंभर टक्के बंदी करण्यात आली तसेच येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीतही थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत राज्यात २९० टन प्लास्टिक जप्त झाले असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देखील महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले आहे.

      – रामदास कदम, पर्यावरणमंत्री