मुंबई विद्यापीठाचा पहिल्या दोनशेत समावेश नाही

आयआयटी मुंबई २९व्या स्थानावर  मुंबई विद्यापीठाचा पहिल्या दोनशेत समावेश नाही
उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या गुणवत्तेनुसार जाहीर करण्यात येणाऱ्या ‘टाइम्स उच्च शिक्षण ब्रिक्स अँड एमर्जिग इकोनॉमिक्स’ यादीत देशातील १६ संस्थांनी पहिल्या दोनशेत स्थान पटकाविले आहे. यामध्ये बेंगळुरू येथील विज्ञान संस्थेने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रगती करत सोळावा क्रमांक पटकाविला आहे. यामुळे पहिल्या २०मध्ये भारतीय संस्थेचा समावेश झाला आहे.
या यादीत मुंबई आयआयटीनेही प्रगती करत गेल्या वर्षीच्या ३७ व्या क्रमांकावरून २९व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. या क्रमवारीत ३५ विकसनशील देशांबरोबरच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील सर्वोत्तम २०० उच्च शिक्षण संस्थांचा समावेश असतो. या क्रमवारीतही चीनचा प्रभाव असून २००पैकी ३९ संस्था या चीनच्या असून पहिल्या दहा पैकी पाच संस्था या चीनमधीलच आहेत. या खालोखाल तैवानच्या २४ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यानंतर भारताचा क्रमांक येत असून देशातील १६ संस्था या यादीत आहेत. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने खूप चांगली बाब असल्याचे क्रमवारी प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाचे संपादक फिल बटी यांनी स्पष्ट केले. तर, या क्रमवारीमुळे आम्हाला खूप आनंद झाल्याची भावना आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी व्यक्त केली. या क्रमवारीच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण विकास करत असल्याचे समोर आले असून ही संस्था देशातील सर्वोत्तम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले. यावर्षीच्या यादीतही मुंबई विद्यापीठाचा समावेश नसून दिल्ली विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ क्रमावारीत मागे पडले आहेत. तर पुणे विद्यापीठाने १२७व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.

देशातील संस्थांची क्रमवारी
बेंगळुरू विज्ञान संस्था – १६, आयआयटी, मुंबई – २९, आयआयटी, मद्रास – ३६, आयआयटी, दिल्ली – ३७, आयआयटी, खडकपूर – ४५, आयआयटी, रुरकी – ४८, जाधवपूर विद्यापीठ – ८०, आयआयटी, गुवाहाटी – ८३, आयआयटी, कानपूर – ९५, पंजाब विद्यापीठ – १२१, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – १२७, कोलकाता विद्यापीठ – १३७, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ – १५०, दिल्ली विद्यापीठ – १५४, अमृता विद्यापीठ – १८१, आंध्र विद्यापीठ – १९३.