पनवेल येथील निळकंठ समूहाच्या ‘निळकंठ लँडमार्क’ या सातमजली इमारतीतील सदनिकांच्या विक्रीवर घातलेले र्निबध उच्च न्यायालयाने नुकतेच उठवले आहेत. मात्र, या इमारतीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची कल्पना ग्राहकांना देऊनच विक्री करता येईल, अशी अट न्यायालयाने घातली आहे.
यशवंत भगत यांनी केलेल्या जनहित याचिकेवर ९ डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्या वेळी ‘निळकंठ समूहा’च्या वतीने या सातमजली इमारतीच्या बांधकामाला नगरपालिकेकडून परवानगी मिळाल्याची कागदपत्रे सादर करण्यात आली. ते विचारात घेत न्यायालयाने सदनिका विक्रीवर घातलेले पूर्वीचे र्निबध उठवले. मात्र, सदनिका विकताना खरेदीदाराला ही याचिका प्रलंबित असल्याची कल्पना द्यावी, तसेच याचिकेवरील अंतिम निर्णयाला अधीन राहून ही खरेदी केली जात असल्याचे खरेदीदारांकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घ्यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. ही इमारत अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप असला तरी ती अवैध आहे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयाने दिलेला नाही.