गणपत पाटील नगरमध्ये वीजपुरवठा देण्यासाठी राजकीय मोहीम

दहिसर पश्चिमेला कांदळवनावरच उभ्या राहिलेल्या गणपत पाटील नगरातील मतपेढीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी झोपडपट्टीवासीयांना विद्युतपुरवठा उपलब्ध करण्याचे दिवास्वप्न दाखविण्यास सुरुवात केली आहे. या अनधिकृत झोपडपट्टीतील रहिवाशांकडून वीजपुरवठय़ासाठी अर्ज भरून घेण्याचा सपाटा राजकीय पक्षांनी लावला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये दहिसर येथील खाडीलगतच्या परिसरात गणपत पाटील नगर उभे राहिले असून धारावीशी स्पर्धा करणारी गणपत पाटील नगरातील झोपडपट्टीसाठी मोठय़ा प्रमाणावर कांदळवनाची कत्तल करण्यात आली आहे. गेल्या २५ वर्षांपासून या झोपडपट्टीत १० ते १२ हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. सागरी हद्द नियंत्रण रेषेच्या आत असलेल्या या झोपडपट्टीला कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. मात्र भूमाफिया तसेच अन्य घटकांच्या मदतीने या परिसराला चोरून वीज, पाणी यांचा पुरवठा केला जात आहे. त्यातच आता या परिसरातील मतपेटीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी येथे अविरत वीजपुरवठय़ाचे गाजर दाखवण्यास सुरुवात केली आहे.

पालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार गणपत पाटील नगरमध्ये तब्बल १४ हजार ५०० मतदार असून आतापर्यंतच्या निवडणुकांत हे मतदार निर्णायक भूमिका बजावत आले आहेत. पूर्वी या भागावर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र आता काँग्रेसचा वरचष्मा कमी झाला असून सेना-भाजपने येथे शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी तर विद्युतपुरवठय़ासाठी झोपडपट्टीवासीयांकडून अर्ज भरून घेण्याचा सपाटा लावला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘सौभाग्य योजने’नुसार झोपडीमध्ये वीजपुरवठा करण्याचे स्वप्न भाजपचे नेते झोपडपट्टीवासीयांना दाखवत आहेत. मात्र या योजनेनुसार शहरातील झोपडीत वीजपुरवठा करण्याची तरतूद नाही. असे असताना केवळ मतदारांना भुलविण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसेना-भाजपने निवडणुकीवर डोळा ठेवून गणपत पाटील नगरच्या रहिवाशांना वीज-पाण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप, येथील स्थानिक नेते राम यादव यांनी केला आहे. ‘महाराष्ट्र सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय, तसेच सागरी हद्द नियंत्रण कायद्यानुसार कांदळवनावर उभ्या झोपडपट्टीत विद्युतपुरवठा करता येत नाही,’ असे यादव म्हणाले.

या झोपडपट्टीत सध्या चोरीची वीज वापरली जात आहे. त्यामुळे भाजपने पंतप्रधान सौभाग्य योजनेद्वारे या झोपडपट्टीतील रहिवाशांना वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली होती. महाराष्ट्र सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (एमसीझेडएमए) परवानगी मिळाली आहे.

मनिषा चौधरी, भाजप आमदार

गणपत पाटील नगरमध्ये सबस्टेशन उभारता यावे यासाठी रिलायन्स वीज कंपनीच्या माध्यमातून झोपडपट्टीवासीयांकडून अर्ज भरुन घेण्यात आले. हे अर्ज महाराष्ट्र सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले आहेत. या प्राधिकारणाकडून परवानगी मिळाली तर तेथे विद्युत उपकेंद्र उभारता येईल आणि झोपडपट्टीतील वीज चोरीच्या प्रकारांना आळा बसेल.

अभिषेक घोसाळकर, स्थानिक शिवसेना नगरसेवक