महापालिका, पोलिसांकडून कारवाईसाठी टाळाटाळ

झाडांची विनापरवानगी कत्तल करणे हा दंडनीय अपराध असताना चेंबूरमधील दोन विकासकांनी कायदा आणि नियम धाब्यावर बसवत इमारतींच्या बांधकामासाठी अनेक झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याबाबत पालिका आणि पोलिसांकडे तक्रारी करून सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी काहीही कारवाई झालेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून चेंबूर परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकामावेळी अनेकदा जुनी झाडे अडथळा ठरत असल्याने विकासक ही झाडे कापण्यासाठी पालिकेकडे अर्ज करत असतात. मात्र काही वेळा पालिकेकडून परवानगी मिळत नसल्याने विकासक रासायनिक प्रक्रिया करून झाडांचा बळी घेतात अथवा रात्रीच्या वेळी या झाडांची कत्तल केली जाते. अशाच प्रकारे चेंबूरमधील सेल कॉलनी येथील ‘वीणा डेव्हलपर्स’ या विकासकाने पालिकेकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता दोन झाडांची कत्तल केल्याचे समोर आले आहे, तर चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील सरोज स्विट या दुकानासमोरही ‘करिश्मा बिल्डर’ यांनी या ठिकाणी असलेले जुने जांभळाचे झाड रात्रीच्या वेळी कापून टाकले. आश्चर्याची बाब म्हणजे हे झाड पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयाच्या बाजूलाच होते, तरीही अधिकाऱ्यांच्या नजरेस हा गैरप्रकार पडला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.या दोन्ही घटनांबाबत याच परिसरात राहणारे मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी माहिती अधिकारात पालिकेकडून माहिती मागितली.

या माहितीमध्ये दोन्ही विकासकांनी पालिकेकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे, तसेच या दोन्ही विकासकांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, असे पत्र पालिकेने चेंबूर पोलीस ठाणे आणि नेहरूनगर पोलीस ठाण्याला पाठवले आहेत. मात्र सहा महिन्यांनंतरही पोलिसांकडून याबाबत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.चेंबूर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी, मला याबाबत काहीही माहिती नसून माहिती घेऊन पुढील कारवाई करू, असे स्पष्ट केले. याबाबत करिश्मा बिल्डर यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला.

पालिकेच्या उद्यान विभागाकडून पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. कारवाई झाली नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढण्यात येईल.

हर्षद काळे, सहायक आयुक्त, एमपश्चिम विभाग

सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन झाडे कापली आहेत. पालिका अधिकाऱ्यांनीही पाहणी केली होती.

– अनिल झा, व्यवस्थापक, वीणा डेव्हलपर्स

पोलीस आणि पालिका या दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून या प्रकरणाकडे काणाडोळा करत आहेत. आठ दिवसांत या विकासकांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

नितीन नांदगावकर, मनसे नेता