मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांत आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील घडामोडींतून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी मुंबई, रायगड जिल्ह्य़ात काही ठिकाणी, पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांत घाटमाथ्यावर विखुरलेल्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे पश्चिम मध्य दिशेला आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कनार्टक-गोवा किनारपट्टीवर चक्रीवादळ परिस्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातची दक्षिण किनारपट्टी या भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ  शकते. दोन्ही ठिकाणच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते.

गुरुवारी पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्य़ांत विखुरलेल्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (६५ ते २०० मिमी) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर सिंधुदुर्ग, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार (६५ ते ११५ मिमी) पाऊस पडू शकतो. या काळात समुद्र खवळलेला राहणार आहे. समुद्रावर ताशी ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत उत्तर कोकणातील किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तर गुरुवार आणि शनिवार या काळात दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे धोकादायक असेल.

मुंबईत विक्रमाची शक्यता..

मुंबईत या वर्षी संपूर्ण मोसमातील (जून ते सप्टेंबर) एकूण पावसाचे प्रमाण गेल्या सत्तर वर्षांतील सर्वाधिक नोंदीच्या जवळ पोहोचले असून पुढील दोन आठवडय़ांत हा आकडा ओलांडून मोसमातील सर्वाधिक पावसाचे नवी नोंद या वर्षी होण्याची शक्यता आहे.

१९५० ते २०१९ या काळात मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद १९५८ साली ३,७५९.७ मिमी, तर सर्वात कमी पावसाची नोंद १९८६ साली १,३४१.९ इतकी होती. या वर्षी १ जूनपासून १८ सप्टेंबपर्यंत मोसमातील एकूण पावसाची नोंद ३,४७५.२ मिमी झाली आहे. पावसाळ्याचे अजून दोन आठवडे बाकी आहेत आणि पुढील काही दिवसांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा १९५८ ची मोसमातील सर्वाधिक पावसाची आकडेवारी ओलांडली जाण्याची शक्यता आहे.