News Flash

“शिवसेनेच्या गुंडांपासून राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करा”; नितेश राणेंची मागणी

उद्धव ठाकरेंनी राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

nitesh rane
नितेश राणे यांनी केली मागणी

कालपासून राज्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे नारायण राणे आणि त्यांचं वक्तव्य. त्यावरुन राज्यात झालेला दंगा, नारायण राणेंची अटक, सुनावणी, जामीन, सुटका हा सगळा नाट्यमय प्रकार महाराष्ट्राने अनुभवला. राज्याला शिवसेना आणि नारायण राणे संघर्ष नवा नसला तरी यावेळी मात्र वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच आता उद्धव ठाकरेंनी राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या गुंडांपासून राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची भेट घेतलेला फोटो नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. नितेश राणे म्हणाले, “काल राज्यात पश्चिम बंगाल प्रमाणेच ही राज्य पुरस्कृत हिंसा होती. राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सुरक्षा सुनिश्चित करतात पण ते तर खरंच गुंडांचा सत्कार करत आहेत! ही महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. या गुंडांपासून सुरक्षा सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राष्ट्रपती राजवट!”

राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत आंदोलनं केली. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं.

यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. “नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?”, असा सवालही सरदेसाईंनी उपस्थित केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2021 4:04 pm

Web Title: implement presidential rule to keep the state safe from shiv sena goons demand of nitesh rane srk 94
Next Stories
1 राज्यभरात दाखल झालेले एफआयआर रद्द करण्यासाठी राणेंची न्यायालयात धाव
2 ‘कागदपत्रांबाबत सामंजस्याने तोडगा काढला जाईल’
3 कॅमेरे बसवण्याची तंबी
Just Now!
X