कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी आज महाराष्ट्र बंद असताना मुंबईत ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने होत आहेत. दरम्यान, अंधेरीच्या चांदिवली परिसरात Indus OS नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीत बुधवारी सकाळच्या दरम्यान काही आंदोलनकर्ते घुसले आणि त्यांनी ऑफिस बंद करा अशी मागणी करीत कर्मचारी आणि प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते, मात्र नंतर त्यांनी यातून काढता पाय घेतला.

या परिसरात तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा प्रकार थांबवण्यात यश आले आहे. दरम्यान, मुंबईतल्या अनेक भागात सध्या आंदोलने सुरु असून काही ठिकाणी जाळपोळीच्या हिंसक घटना घडल्याचे कळते.

भीमा कोरेगाव (पुणे) येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर हल्ला करुन काही समाजकंटकांनी दंगल घडवली होती. यामध्ये दंगल माजवणाऱ्या लोकांनी खासगी वाहनांसह अग्निशामक दलाच्या गाड्यांची जाळपोळ केली होती. याच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार बंद दरम्यान राज्याच्या विविध भागात अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या नोंदी आहेत.