नावात ओळख शोधण्यापेक्षा सध्या नशीब शोधण्याचे प्रकारच जोरात आहेत. त्यामुळे आपले नशीब फळफळावे यासाठी कुण्या गुरूच्या किंवा ज्योतिषाच्या सल्ल्यावरून राज्य सरकारच्या राजपत्रात नाव बदलण्याचे प्रकार चांगलेच वाढले आहेत.
नाव, वय, धर्म यात बदल करण्यासाठी राज्य सरकारच्या राजपत्रात जाहिरात द्यावी लागते. अर्थातच नाव बदलाची जाहिरात देणारे यात सर्वाधिक असतात. चर्नी रोड येथील सरकारच्या जाहिरात विभागात दरवर्षी साधारणपणे दोन लाख अर्जदार आपल्या नावात, आडनावात वेगवेगळ्या कारणांसाठी बदल करण्यासाठी येतात. नावात बदल करू इच्छिणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त महिला असतात. लग्नानंतरच्या नावात होणारा बदल राजपत्रात जाहिरात देऊन त्यावर शिक्कामोर्तब करून घेण्याची तशी काहीच गरज नसते. पण, नाव बदलल्यानंतर राजपत्रात जाहिरात द्यावीच लागते, या गैरसमजुतीतून अनेक महिलांचे अर्ज जाहिरात विभागाकडे येतात. या व्यतिरिक्त जन्माच्या किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर चुकीचे नाव लिहिले, नाव आवडत नाही, मूळ आडनाव लावायचे आहे आदी कारणांसाठी नाव बदलणारे बरेच आहेत. आता यात ज्योतिषाच्या किंवा आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्यावरून नव्या नावात नशीब शोधण्यासाठी नाव बदलणाऱ्यांही भर पडते आहे, अशी माहिती सरकारी मुद्रणालय संचालनालयाचे संचालक परशुराम गोसावी यांनी दिली.
आश्चर्य म्हणजे प्रौढ व्यक्तींमध्येच नव्हे तर तरुणांमध्येही ज्योतिषाच्या सल्ल्यावरून नावबदल करण्याचे प्रमाणे वाढते आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. बारावीतील एक मुलगी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे नाव बदलण्यासाठी म्हणून आली. आपले नाव अमुकवरून तमुक करावे, असा सल्ला तिला एका ज्योतिषाने दिला होता. पुढचे पदवीपर्यंतचे शिक्षण यशस्वीपणे घ्यायचे असेल तर नाव बदलायला हवे, असे त्या ज्योतिषाचे म्हणणे पडले म्हणून ती नाव बदलण्यासाठी येथे आली होती.
जुने नाव टाकून दुसरे नाव लावणे, नावातील अक्षररचना बदलणे, अक्षरसंख्या वाढविणे, नाव इंग्रजीत असल्यास स्पेलिंग बदलणे असे नाना प्रकारचे बदल ज्योतिषाच्या सल्ल्यावरून केले जातात.
आपल्याकडच्या एका ‘आदर्श’वादी माजी मुख्यमंत्र्यांनी तर आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या सल्ल्यावरून आपले पाच अक्षरी नाव बदलून आठ अक्षरी केले होते. पण, पंधराच दिवसात या मुख्यमंत्र्यांना आपले चंबूगवाळे आवरून घरचा रस्ता धरावा लागला. दैवापेक्षा आपले कर्मच कसे फुटके ठरते, याचा धडा तरी यावरून मिळायला हरकत नसावी. नशीब बदलण्यासाठी नावबदल करू इच्छिणारी रजनीचे ‘रजनीगंधा’ किंवा मीनाक्षीचे ‘मीनाकुमारी’, महेशचे ‘महेशराव’, मनीषचे ‘मनीष’ अशी किती तरी उदाहरणे देता येतील.