टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर दक्षिण मुंबईमधील गिरगाव, मलबार हिल, ग्रॅन्ट रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल परिसरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये करोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे.

येथील रहिवासी सुरक्षेची काळजी न घेता फिरत असावेत अथवा घरकामगारांमुळे प्रसार होत असल्याच्या निष्कर्षांप्रत पालिका पोहोचली आहे. सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अनलॉकडाऊन सुरू झाल्यानंतर हळूहळू दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच काही खासगी कंपन्यांनीही कार्यालये सुरू केली असून सरकारच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यात येत आहे. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत. खासगी वाहनेही मोठय़ा संख्येने रस्त्यावर धावत आहेत. पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील गिरगाव, मलबार हिल, वाळकेश्वर, नेपीअन्सी रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल, ग्रॅन्ट रोड या परिसरांतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडू लागले आहेत. गेल्या ११ दिवसांमध्ये या परिसरात ३७५ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

कारण काय? : टाळेबंदी शिथिल केल्यानंतर बहुतांश गृहनिर्माण सोसायटय़ांमधील नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडत आहेत. तसेच काही सोसायटय़ांमध्ये घरकामगार रुजू झाले आहेत. रहिवासी सुरक्षेबाबत काळजी न घेता फिरत असावेत किंवा घरकामगारांच्या माध्यमातून त्यांना करोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नेमके कारण पालिका अधिकाऱ्यांनाही अद्याप समजलेले नाही. सोसायटय़ांमधील प्रसाधनगृहांचा वापर घरकामगारही करतात. त्यामुळे प्रसाधनगृह निर्जंतुक करण्याची गरज आहे. सोसायटय़ांमधील करोना संसर्गाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पालिकेने हालचाल सुरू केली आहे. सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन बाहेरून येणाऱ्याची तापमान तपासणी, निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे आदी सूचना सोसायटय़ांमधील रहिवाशांना करण्यात येत आहेत.

उच्चभ्रू वस्त्यांमध्येही करोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेण्यात येत आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत रहिवाशांना सूचना करण्यात येत आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग