अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवस्मारक समितीकडून करण्यात आली आहे. सध्याच्या आराखड्यानुसार या स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची १९२ मीटर इतकी आहे. मात्र, हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरावा यासाठी ही उंची २१० मीटर इतकी करण्यात यावी, अशी शिवप्रेमींची भावना असल्याचे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरेल. सध्या चीनमध्ये असणारा बुद्धांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी कंत्राटदार निश्चित झाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे विनायक मेटे यांनी सांगितले.
२४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. या सोहळ्याच्यानिमित्ताने भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील १५.९६ हेक्टर बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम संस्मरणीय ठरावा, यासाठी राज्यातील ७० हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरील माती या ठिकाणी आणण्यात आले होते. मात्र, स्मारकाची ठरलेली जागा योग्य नसून त्यामुळे ८० हजार स्थानिकांचा रोजगार धोक्यात येईल, तसेच परिसरातील समुद्री जीवांना धोका उत्पन्न होईल, असे सांगत ‘अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती’ने या स्मारकाला विरोध दर्शविला होता. स्मारकाच्या नियोजित स्थळी समुद्रात चाळीस एकरचा खडकाळ भाग आहे. माश्यांसाठी नैसर्गिक खाद्य मिळणारी व त्यांच्या प्रजननास योग्य अशी ही जागा आहे. प्रवाळ (कोरल), ‘सी फॅन’ आणि ‘स्पाँज’ या ‘शेडय़ूल्ड’ समुद्री जीवांचे आणि डॉल्फिन्ससारख्या जीवांचेही या परिसरात वास्तव्य आहे, असे मच्छिमारांकडून सांगण्यात आले होते.