आतापर्यंत मुंबईत रुग्णांची संख्या सर्वात कमी असलेल्या दहिसरमध्ये गेल्या आठवडय़ाभरात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. मुंबईच्या सीमेवर असलेल्या दहिसर, बोरिवली, मुलुंड, भांडुप या उपनगरांमध्ये रुग्ण झपाटय़ाने वाढू लागले आहेत.

करोनाने मुंबईच्या शहर भागात कहर केलेला असताना मुंबईच्या सीमेवर असलेल्या दहिसर, बोरिवली, मुलुंडमध्ये रुग्ण तुरळक होते. मुंबईच्या उपनगरातील सहा विभागांमध्ये गेल्या आठवडय़ाभरात वेगाने रुग्णवाढ होते आहे. करोनाचा हॉटस्पॉट असलेल्या वरळी, भायखळा, ग्रँटरोडमधील रुग्णवाढ २ ते ३ टक्के असताना सीमेवरील विभागात रुग्णांची वाढ ही ५ ते ८ टक्के या वेगाने सुरू आहे. पश्चिम उपनगरात दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड तर पूर्व उपनगरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपपर्यंत रुग्ण वेगाने वाढत आहेत.

मुंबईत पोलीस दलात १८ करोनाबळी

करोना संसर्गाची लागण झालेल्या आणखी दोन पोलिसांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील बाधितांच्या मृत्यूची संख्या १८ झाली आहे.  सांताक्रूज पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन कोळी (५२) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. चाचणीतून ते करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. उपचार सुरू असतानाच सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. मालाड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार विक्र म जाधव यांचाही करोनामुळे मृत्यू झाला. राज्यात करोनाबाधित १४७९ पोलीस उपचार घेत आहेत.

विभाग                    रुग्णसंख्या

दहिसर                      ४६९

बोरिवली                    ८९७

कांदिवली                  १०४९

मालाड                       १५११

मुलुंड                          ८२३

भांडुप, विक्रोळी        १७०५

घाटकोपर                  १९८४