सांगली—मिरज—कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. सांगली महापालिलेकातील सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले असून राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला असेत पराभवाचे धक्के देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या एककल्ली कारभाराला जनता कंटळली असून विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार – तपासे
पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवापासून पश्चिम महाराष्ट्रातून भाजपच्या अधोगतीला सुरुवात झाली. सांगली महापौरपदाच्या निवडणुकीतील आघाडीच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:00 am