वादग्रस्त विधानांमुळे इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा निर्णय

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

कौरव म्हणजे टेस्टटय़ूब बेबी, रावणाकडे २४ विमाने होती, गुरूत्वाकर्षण लहरींना मोदी लहरी म्हणा, अशा छद्मविज्ञानी विधानांमुळे बेरंग होण्याचा अनुभव घेतल्यानंतर इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशनने संभाव्य कार्यक्रम आणि व्याख्यानांचे पूर्वपरीक्षण करण्याचा निर्णय सोमवारी घेतला.

इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशनच्या फगवाडा येथील सायन्स कॉंग्रेसचा समारोप सोमवारी झाला. कौरव म्हणजे टेस्ट टय़ूब बेबी, रावणाची २४ विमाने होती, विष्णूचे दशावतार म्हणजे डार्विनचा सिद्धांत अशा आशयाची विधाने आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी. नागेश्वर राव यांनी व्याख्यानात केली होती. त्याचबरोबर प्रा. कानन कृष्णन यांनीही गुरूत्वाकर्षण लहरींचे नामांतर नरेंद्र मोदी लहरी करण्यात यावे, असे विधान केले होते. त्यामुळे ‘सायन्स कॉंग्रेस’वर देशभरातून टीका झाली. संशोधकांनी विधानांचा निषेध केला. यापूर्वीही अशा प्रकारच्या विधानांमुळे ‘सायन्स कॉंग्रेस’ वादग्रस्त ठरली होती. हे टाळण्यासाठी व्याख्यानांचे आणि कार्यक्रमांचे पूर्वपरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘पुढील वर्षांपासून आमंत्रित केलेल्या वक्त्यांसह सहभागी होणाऱ्या सर्व संशोधकांना त्यांच्या व्याख्यानाचा गोषवारा आधी सादर करावा लागेल. त्याचे परीक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. तिच्या सूचनांनुसार वक्ते, व्याख्याने, विषय निश्चित केले जातील, अशी माहिती असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. प्रेमानंद माथूर यांनी दिली. ‘साधारणपणे भटनागर पुरस्कार विजेत्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात येते. व्याख्यानांचे विषय किंवा ते अशा प्रकारे होईल याची आम्हालाही कल्पना नव्हती. त्यांची विधाने ही त्यांची वैयक्तिक मते आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील काँग्रेस बंगळुरूमध्ये

देशात १९१४पासून विज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सायन्स काँग्रेस आयोजित केली जाते. या वर्षी, काँग्रेसमध्ये १५ हजारांहून अधिक प्रतिनिधी, विद्यार्थी, संशोधक सहभागी झाले होते. पुढील वर्षी सायन्स काँग्रेस बंगळुरू येथे होणार आहे.