भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालान याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. अल जझीरा या परदेशी वृत्तवाहिनीने कथित स्टिंग ऑपरेशनद्वारे भारताने क्रिकेट कसोटी सामने फिक्स केल्याचा दावा केला होता. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सोनू जालानची अटक ही पहिली कारवाई असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. यात अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनू जालान हा मुंबईच्या सट्टा बाजारातील मोठा सट्टेबाज असून त्याचे परदेशात अनेक ग्राहक आहेत. यांपैकी अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि सौदी अरेबिया या ठिकाणच्या ग्राहकांशी तो संपर्कात असतो. तर भारतातही त्याची मोठी टोळी असून ते दिल्ली, कोलकाता, राजस्थान, गुजरात, हरयाणा येथून त्याचे साथीदार सट्टा खेळतात.

सोनू जालान कांदिवली (प) येथील अगरवाल रेसिडन्सी येथे राहत असून त्याला मुंबई पोलिसांनी अनेकदा क्रिकेट सामन्यांवर  सट्टे लावल्याने अटक केली आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला नुकतीच अटक केली असून त्याची अधिक चौकशी सुरु आहे. या चौकशीत आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातील अनेक बडे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

दरम्यान, भारताने २०१६-१७ या कालावधीत मायदेशात आणि परदेशात खेळलेल्या कसोटी सामन्यांपैकी एकूण ३ कसोटी सामने हे फिक्स असल्याचा दावा अल जझीरा या परदेशी वृत्तवाहिनीने नुकताच केला होता. त्यावर बीसीसीआयने याबाबत आधीच चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले होते. या संदर्भात प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याची चौकशी सुरु आहे. त्याची चौकशी पूर्ण होऊन आधी आयसीसीने मॉरिसला दोषी ठरवू देत. आयसीसीच्या निर्णयाची प्रत हाती आल्यावरच बीबीसीसीआय या संदर्भात कारवाई करेल, असे बीसीसीआयने म्हटले होते.

यापार्श्वभूमीवर सट्टेबाज सोनू जालानची झालेली ही पहिलीच अटक असून ती महत्वाची मानली जात आहे. कारण, यामधील चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.