मुंबईतील एसटी आगारात, नियंत्रण कक्षात चौकशी; रेल्वे प्रवाशांना मात्र तपासणी अनिवार्य

मुंबई : मुंबई महानगरात करोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुंबई महापालिके ने एसटी आगार, रेल्वे स्थानक व टर्मिनसवर प्रवाशांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी सक्ती नाही. के वळ संशयित प्रवाशांचीच चाचणी करण्यात येत आहे. एसटी आगारात  चाचणी होणार यामुळे प्रवासी धास्तावले होते. परिणामी, मुंबईतील एसटी आगारातील तिकीट खिडकी आणि नियंत्रण कक्षातील दूरध्वनी चौकशीसाठी सतत खणखणत होते. प्रवाशांना सक्ती नसल्याने चाचणी करून घेण्यासाठी प्रवासी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनाही करोना तपासणी व चाचणीचे दिव्य पार करावे लागत आहे.

एसटी आगारात येणाऱ्या दररोज एक हजार प्रवाशांची चाचणी करण्याचे उद्दिष्ट पालिके ने निश्चित केले आहे. परंतु या चाचण्यांची सक्ती नाही. मात्र अनेक प्रवासी मुंबईतील परळ, मुंबई सेन्ट्रल, कु र्ला नेहरू नगर, बोरिवली नॅन्सी कॉलनी आगार, स्थानकांत चौकशीसाठी येत आहेत. काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासाचे नियोजन करणारी मंडळी आधी चाचणीची चौकशी करीत आहेत. दरवर्षी होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यंदाही कोकणात जाण्यास अनेक जण उत्सुक आहेत. परंतु कोकणात येण्यासाठी गर्दी करू नका, प्रतिबंधित क्षेत्रांतून येणाऱ्यास ७२ तास आधी करोना चाचणी बंधनकारक, कोकणात येणाऱ्यांची तापमान तपासणी करणे अशी नियमावली कोकणातील स्थानिक प्रशासनाने तयार केली असतानाच मुंबई पालिके नेही चार दिवसांपूर्वी एसटी आगारांत प्रवाशांची करोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आणि एकच गोंधळ उडाल्याचे एसटी आगार, स्थानकांतही निदर्शनास आले.

एसटीच्या परळ, कुर्ला-नेहरूनगर आगारात सोमवारपासून चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ही चाचणी सक्तीची नसून ज्यांना लक्षणे आहेत किंवा ज्या प्रवाशांना स्वत:हून पुढाकार घेऊन चाचणी करायची असल्यास ती केली जात असल्याची माहिती उपस्थित पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यात करोनाचा वाढलेला संसर्ग, काही ठिकाणी निर्बंधयांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच आहे. त्यामुळे एसटी आगारात प्रवासी कमी दिसतात. त्यातच सक्ती नसल्याने चाचणी करून घेण्यासाठी प्रवासी पुढे येत नसल्याचे चित्र मुंबईतील एसटी आगारांत दिसत होते.

रेल्वे स्थानकांत दररोज मेल-एक्स्प्रेसमधून येणाऱ्या साधारण एक हजार प्रवाशांची चाचणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वांद्रे टर्मिनस, बोरिवली, मुंबई सेन्ट्रल टर्मिनस, सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवरही करोना चाचणीसाठी पालिके ने जय्यत तयारी केली आहे. टाळेबंदीच्या काळात विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथे चाचणीची व्यवस्था केली होती. ती आजपर्यंत कायम आहे. नुकतीच पालिकेकडून त्यासंदर्भात कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्यानंतर सर्वच प्रवाशांची तापमान तपासणी व संशयास्पद प्रवाशांची करोना चाचणी केली जात आहे. यात स्थानकातील पळवाटाही बंद करण्यात आल्या असून चाचणी केंद्राजवळच रेल्वे पोलीसही तैनात के ले आहेत.

प्रत्येक टर्मिनसवर दररोज ५०० प्रवाशांची चाचणी

परराज्यातून येणाऱ्या करोनाबाधित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. सीएसएमटी, वांद्रे टर्मिनस, एलटीटी, मुंबई सेन्ट्रल या महत्त्वाच्या टर्मिनसवर पालिकेचे कर्मचारी २४ तास तैनात असून परराज्यातून प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची प्रतिजन (अँटीजन) चाचणी केली जात आहे. याशिवाय दादर, बोरिवली, अंधेरी, ठाणे या स्थानकांतही प्रवाशांची तपासणी होत आहे. टर्मिनसवर दर दिवशी ५०० हून अधिक प्रवाशांची तपासणी व चाचणी केली जात आहे. त्यातील काही टर्मिनसवर ४ ते ६ व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास येत आहे. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या शरीराचे तापमान पालिकेचे कर्मचारी तपासत आहेत. यातील ज्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान मर्यादेपेक्षा अधिक असते, त्यांची करोना चाचणी करण्यात येते. वांद्रे टर्मिनसवर बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत ७ रेल्वे गाडय़ांमधून प्रवास करून आलेल्या ३११ प्रवाशांची चाचणी करण्यात आली होती. यातील ४ प्रवाशांचे अहवाल बाधित आले.

पळवाटा बंद

परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाचे शारीरिक तापमान तपासता यावे यासाठी वांद्रे टर्मिनससह, एलटीटी यांसह मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा असलेल्या स्थानकांतील प्रवाशांच्या पळवाटा बंद करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच रेल्वे पोलीसही तैनात केले आहेत. स्थानकातून बाहेर पडण्यासाठी एकच प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले आहे. पालिकेचे एक डॉक्टर, चार कर्मचारी आणि खासगी प्रयोगशाळेचे चार कर्मचारी चाचणी के ंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. परिणामी तपासणीची प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यात मदत होत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. पहाटे चारपासूनच या स्थानकात आरोग्य कर्मचारी तैनात होतात.

३१७ तिकिटे रद्द

कोकणात होळीनिमित्त १९ मार्च ते २४ मार्च दरम्यानही अनेक जण गेले आहेत. यात ६ हजार ९९१ तिकिटे आरक्षित करण्यात आली होती, तर ३१७ तिकिटे रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

ज्येष्ठ नागरिकही प्रवाशांच्या रांगेत

गरज असेल तरच रेल्वे प्रवास करा, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणे टाळा, असे आवाहन के ंद्र व राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र तरीही ज्येष्ठ नागरिक, लहान मुले पालकांसोबत प्रवास करताना दिसत आहेत. रेल्वे टर्मिनसवर उतरताच करोना तपासणी व चाचणी करतानाच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकही असतात. मधल्या स्थानकात उतरल्यानंतर चाचणीसाठी लागलेल्या रांगेत ज्येष्ठ नागरिक व लहानग्यांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. काही प्रवासी प्रवासाआधीच करोना चाचणी करून अहवाल मिळवितात. त्यामुळे त्यांना मुंबईतील रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अहवाल दाखवून त्वरित निघून जाता येते.

मी २६ मार्चला होळीनिमित्त दापोलीला जाण्यासाठी परळ आगारातून एसटीचे तिकीट काढले आहे. मुंबईतील एसटी आगारातही प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. त्यामुळे कुटुंबासह जाताना आयत्या वेळी गोंधळ नको म्हणून पुन्हा एसटी आगारात येऊन त्यासंदर्भात चौकशी केली आहे. चाचणी करण्यासाठी सक्ती नसल्याचे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. – नरेश घाणकुटकर, एसटी प्रवासी

 

मी वरळीला राहतो. होळीनिमित्त २६ मार्चला गावी मंडणगडला जाणार होतो. पण आता जाणार नाही. परळ आगारातून एसटीचे तिकीट होते. परंतु ते रद्द करत आहे. मुंबईतून जाताना व आल्यावर व कोकणात करोना चाचणीसाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळेच गावी जाण्याचा बेत रद्द के ला. – अनंत घोसाळकर, एसटी प्रवासी