परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या करण्यास सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी तीन प्रवासी बाधित आढळले. दिवसभरात सहा प्रमुख स्थानकांवर १३,२५३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

राजस्थान, दिल्ली, गोवा आणि गुजरात या चार राज्यांतून सौराष्ट्र मेल, बिकानेर-दादर, भुज-दादर, अजमेर एक्स्प्रेस या गाडय़ांमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांची गुरुवारी तपासणी करण्यात आली. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, बोरिवली या सहा प्रमुख स्थानकांवर पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांनी आपली यंत्रणा उभी केली होती. त्यात १३,२५३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यात दादर स्थानकांवर दोन प्रवासी तर वांद्रे टर्मिनस स्थानकावर एक प्रवासी बाधित आढळला. बुधवारी दिवसभरात १० प्रवासी बाधित आढळले होते.