चंद्रपूरचा उमेदवार बदलला, हिंगोलीत शिवसेनेच्या माजी खासदाराला उमेदवारी

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून झालेला घोळ आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेली हतबलता या पाश्र्वभूमीवर अखेर उमेदवार बदलून शिवसेनेतून दाखल झालेले माजी आमदार सुरेश धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली.

हिंगोलीत खासदार राजीव सातव यांनी लढण्यास नकार दिल्याने त्यांचे राजकीय विरोधक शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना मात्र उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील दोन मतदारसंघ आणि पुण्याच्या उमेदवारीचा घोळ सुरूच आहे. दुसरीकडे, भाजपने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून शनिवारी घोळ झाला होता. विनायक बांगडे यांना उमेदवारी दिल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हतबलता व्यक्त केली होती. आपले कोणीच ऐकत नाही आणि आपण राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याची चव्हाण यांची ध्वनिफीतही प्रसारित झाली होती. चंद्रपूरमध्ये उमेदवारी मिळेल या आशेवर शिवसेनेचे सुरेश धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. या साऱ्या गोंधळाची दिल्लीने दखल घेतली आणि धानोरकर यांची उमेदवारी जाहीर केली.

हिंगोलीत खासदार राजीव सातव यांनी लढण्यास नकार दिला. या मतदारसंघात गेल्या वेळी फक्त दोन हजार मतांनी पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. चंद्रपूर आणि हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसने शिवसैनिकांना उमेदवारी दिली आहे.

रामटेक (राखीव) मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी खासदार मुकुल वासनिक इच्छुक होते. त्यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली होती. पण स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. वासनिक यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्याऐवजी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गजभिये यांनी २०१४मध्ये विधानसभा निवडणूक बसपमधून लढविली होती. गजभिये यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील एक गट नाराज झाला आहे.

एक अल्पसंख्याक

  • काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये एका अल्पसंख्याक समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची जुनीच परंपरा आहे.
  • अकोला मतदारसंघातून हिदायत पटेल यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वेळी पटेल दुसऱ्या क्रमांकावर, तर प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते.
  • पटेल यांच्या उमेदवारीमुळे सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्याचे काँग्रेसचे समीकरण पूर्ण झाले.

मुंबई, पुणे प्रलंबित आघाडीत काँग्रेसच्या वाटय़ाला २४ जागा

आल्या आहेत. आतापर्यंत २१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुणे, उत्तर-पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई या तीन मतदारसंघांमधील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. पुण्यात कोणाला उमेदवारी द्यायची याचा घोळ सुरूच आहे.

कार्ती चिदंबरम यांना उमेदवारी

  • माजी वित्तमंत्री आणि काँग्रेसनेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांना शिवगंगा या तमिळनाडूतील मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • पैशाच्या अफरातफरीवरून कार्ती यांना अटकही झाली होती. चिदम्बरम यांनी लढण्यास नकार दिल्याने त्यांच्या पुत्राला पुन्हा संधी देण्यात आली आहे.
  • २०१४ मध्येही कार्ती यांनी निवडणूक लढविली होती, पण त्यांची अनामत जप्त झाली होती. यंदा द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी असल्याने कार्ती यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

वसंतदादांच्या नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू माजी केंद्रीय राजमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केले. याच मेळाव्यात वसंतदादा पाटील यांचे दुसरे नातू विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आली आहे.