देवेंद्र फडणवीसांकडून माझ्यावर खोटेपणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी मला खोटं म्हटल्यामुळे मी संवाद थांबवलाय. त्यामुळे यापुढे भाजपा खरं बोलणार असेल तरच युती होईल, असा ठाम पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, “खोटेपणा स्वीकारेपर्यंत फडणवीसांशी मी बोलणार नाही. मला वेळ असला तरी मला त्यांच्याशी बोलायच नाही. मला असला खोटा नेता नको आहे. युती ठेवायची असेल तर त्यांनी आधी शपथ घ्यावी की मी खोट बोलणार नाही. खोट बोलून सत्तेचे गाजर दाखवून काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये.”

मी वारंवार भाजपाला हेच सांगितलंय की, लोकसभेच्यावेळी जे सुत्र ठरलं होत त्याचप्रमाणे गोष्टी व्हायला हव्यात, त्यापुढे सुईच्या टोका एव्हढही मला नको. मात्र, अमित शहा आणि कंपनीने मला खोट ठरवलं. हिंदुत्वासाठी युती असल्याचे वारंवार भाजपाकडून सांगितले जात आहे. मात्र, आता मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारायचं आहे की खोटं बोलणारी माणसं तुमच्या हिंदुत्वात बसत का? अशा कठोर शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि संघावरही निशाणा साधला.

शिवसैनिकांसमोर खोटारडा म्हणून मी जाणार नाही. आमच्या घराण्याने कधीही खोटं बोलून काम केलेलं नाही. खोट बोलायला मी भाजपावाला नाही, त्यामुळे यापुढे भाजपा खरं बोलणार असेल तरच युती होईल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.