डोंगरीत निरीक्षणगृहातील बालगुन्हेगाराची पोलिसांच्या मदतीने शैक्षणिक प्रगती

मुंबई : अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलाने निरीक्षणगृहातच अभ्यास करून बारावीत चांगले गुण मिळविले आहेत. डोंगरी निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे या मुलाला परीक्षेत यश मिळविणे शक्य झाले आहे.

मूळचा उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे राहणारा राजेश (वय१७) (नाव बदलेले आहे) हा २०१७ मध्ये मुंबईत पर्यटनासाठी आला होता. नेहरूनगर, कुर्ला परिसरात राहणाऱ्या त्याच्या वडिलांजवळ काही दिवस तो होता. त्यानंतर याच परिसरातील एका आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून तो उत्तर प्रदेशला निघून गेला. अपहरण केलेल्या मुलाची सुटका करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे त्याने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलाच्या वडिलांनी याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. याच दरम्यान अपहरण करण्यात आलेला मुलगा आणि अपहरणकर्ता उत्तर प्रदेश येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन अपहरण केलेल्या मुलाची सुटका केली आणि राजेशला ताब्यात घेतले.

राजेश १४ जून २०१७ रोजी तो डोंगरी निरिक्षणगृहात दाखल झाला. त्याच वेळी अकरावीत उत्तीर्ण होऊन त्याने बारावीत प्रवेश मिळवला होता. त्यामुळे त्याला बारावीची परीक्षा द्यायची होती. त्याने ही बाब येथील अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. मुलाचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी येथील मुख्याधिकारी प्रवीण भावसार, अधीक्षिका तृप्ती जाधव, परिवेक्षक अधिकारी आर. कुलकर्णी आणि अमोल शिरोरे यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाची मंजुरी मिळताच, अधिकाऱ्यांनी राजेशच्या महाविद्यालयाशी संपर्क साधून त्याचा ऑनलाइन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल होताच अधिकाऱ्यांनी त्याच्या अभ्यासाची तयारी सुरू केली. यासाठी त्याला वह्या आणि पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. शिकवणीसाठी निरीक्षणगृहाताच खास एका शिक्षकाला पाचारण करण्यात आले. अखेर डिसेंबरमध्ये राजेशची न्यायालयाने सुटका केली. त्यानंतर त्याने त्याच्या मूळ गावी जाऊन बारावीची परीक्षा दिली. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बारावीचा निकाल जाहीर झाला. यात राजेशला ५१ टक्के गुण मिळाले. डोंगरी निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे वर्ष वाचल्याने राजेशने तात्काळ येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि निकालाची माहिती त्यांना दिली.