News Flash

कमला मिल अग्नितांडव : ‘यशा’चे ते स्वप्न अखेर अपूर्णच राहिले!

यशा गुजरातहून मुंबईत पहिल्यांदाच आली होती

कमला मिल अग्नितांडव : ‘यशा’चे ते स्वप्न अखेर अपूर्णच राहिले!
गुजरातहून मुंबईत आलेल्या यशा ठक्करचा कमला मिलच्या अग्नितांडवात मृत्यू

मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या अग्नितांडवाने १४ आयुष्ये भस्मसात केली. मृत्यू झालेल्या सगळ्यांचेच हे काही मरणाचे वय नव्हते. गुजरातहून मुंबईत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या यशा ठक्करची कहाणीही हृदय पिळवटून टाकणारीच आहे.

गुजरातमधून २२ वर्षांची यशा ठक्कर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी खास मुंबईत आली होती. ३१ डिसेंबरला काय करायचे? थर्टी फर्स्टचा प्लान काय करायचा? मुंबईत कुठल्या ठिकाणांना भेट द्यायची? हे सगळे ठरवून आणि त्यादृष्टीने वैविध्यपूर्ण प्रवासाची स्वप्ने पाहून यशा मुंबईत आली. मात्र तिचे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कारण ‘१ अबव्ह’ आणि ‘मोजोस ब्रिस्ट्रो पब’ या ठिकाणी लागेल्या आगीत यशा ठक्करचा मृत्यू झाला.

मुंबईत फिरायला यायचे या उद्देशाने गुजरातहून यशा ठक्कर पहिल्यांदाच मुंबईत आली होती. मात्र गुजरातहून मुंबईला केलेला हा प्रवास अखेरचा प्रवास ठरणार हे या २२ वर्षीय तरूणीच्या गावीही नव्हते. यशा गुरुवारी म्हणजे २८ डिसेंबरच्या रात्री तिच्या चुलत भावासोबत आणि बहिणींसोबत मोजोस ब्रिस्ट्रो रेस्तराँ आणि पबमध्ये जेवणासाठी गेली होती. धमाल-मस्तीच्या मूडमध्ये असलेल्या यशा आणि तिच्या भावंडांच्या मनात पुढे काय होणार याची थोडीही कल्पना नव्हती..

थर्टीफर्स्टला काय करायचे हे ठरवत असतानाच ‘१ अबव्ह’ लागलेल्या आगीचे लोण मोजोस ब्रिस्ट्रोपर्यंतही पोहचले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जीव वाचवण्यासाठी यशा ठक्करच्या चुलत बहिणींनी बाथरूमच्या दिशेने पळ काढला. त्यांचा जीव वाचला.. मात्र यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि होरपळून तिचा मृत्यू झाला. तिने पाहिलेल्या सुंदर स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी झाली. मनात बाळगलेली स्वप्ने पूर्ण होण्याआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला

दरम्यान या सगळ्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कमला मिल कंपाऊंडमध्ये लागेल्या आगीत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले.

हॉटेल ‘१ अबव्ह’ चे मालक हितेश संघवी, जिगर सिंघवी आणि अभिजित मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्नितांडवाची सुरूवात ‘१ अबव्ह’ या रेस्तराँपासून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 2:21 pm

Web Title: kamla mill fire incident 22 years old yasha thakkar dies mojos bistro restaurant
Next Stories
1 BLOG On Kamala Mills Compound Fire: गल्लाभरू मानसिकतेचे १४ बळी
2 Kamala Mills Compound Fire: मुलीसोबत ‘ती’चा शेवटचा डिनर; मुलगी बचावली
3 कमला मिल आग दुर्घटना : राहुल गांधींनी मराठीत व्यक्त केला शोक
Just Now!
X