नमिता धुरी

कुष्ठरोगामुळे हाताची बोटे झडलेल्या किंवा अपघातात संपूर्ण हात गमावलेल्या व्यक्तींना संगणकाचा कीबोर्ड हाताळणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनतो. यावर उपाय म्हणून विलेपार्ले येथे राहणाऱ्या अनिल नेने यांनी ‘कीबोर्ड माऊस इम्युलेटर’ हे उपकरण तयार केले आहे. याद्वारे कोणाच्याही मदतीशिवाय संगणकातील सर्व क्रिया हात नसलेल्या व्यक्तींना करता येतात.

एक ‘कीबोर्ड माऊस इम्युलेटर’ यूएसबी पोर्टच्या साहाय्याने संगणकाला जोडला जातो, तसेच एक स्विच पॅड इम्युलेटरला जोडले जाते. त्यावर डायरेक्शन, मूव्ह, एण्टर असे तीन स्विच दिलेले असतात. लोहचुंबक असलेली कापडी पट्टी (मॅग्नेट होल्डर) हाताच्या पंजाला बांधल्यास त्याच्या साहाय्याने तिन्ही स्विच वापरता येतात. इम्युलेटरच्या स्क्रिनवर सर्व इंग्रजी मुळाक्षरे, अंक लिहिलेले असतात. त्यासोबतच माऊस, अल्फा, कंट्रोल, एण्टर, फं क्शन्स, ड्रॅग, बॅक, कॅप्स, सिम्बॉल, मेल इत्यादी पर्याय असतात.

स्क्रिनच्या एका कोपऱ्यात एक लाल रंगाची पट्टी असते. मॅग्नेट होल्डर तीनपैकी एका स्विचवर असल्यास ही पट्टी लाल दिसते. ते स्विचपासून लांब गेल्यास पट्टी हिरवी होते आणि अपेक्षित क्रिया घडते. ज्यांना संपूर्ण हातच नाहीत अशांसाठी पायाच्या बोटांत पकडण्याचे मॅग्नेट होल्डर नेने यांनी बनवले आहे. हे उपकरण वापरण्याकरिता कुठल्याही बॅटरी किंवा अ‍ॅडप्टरची गरज नाही.

डायरेक्शन स्विचवर मॅग्नेट होल्डर ठेवून ते बाजूला सरकवल्यास लाल पट्टीची दिशा बदलते. मूव्ह स्विचच्या साहाय्याने हवे ते अक्षर निवडता येते. माऊस पर्याय निवडल्यास संगणकावरील कर्सरची हालचाल करता येते. संगणक हाताळणाऱ्याचे टंकलेखन कमी व्हावे याची विशेष काळजी नेने यांनी घेतली आहे. एखाद्या शब्दाची पहिली चार अक्षरे लिहिल्यानंतर ‘ऑटो कम्प्लिट’च्या साहाय्याने संभाव्य शब्दांचे काही पर्याय उपलब्ध होतात. त्यातील एखादा पर्याय निवडता येतो, अन्यथा उर्वरित शब्द स्वत: लिहावा लागतो. इम्युलेटरमधील एसडी कार्ड संगणकाला जोडून ऑटो कम्प्लिट पर्यायातील शब्दांची यादी वाढवता येते. एसडी कार्डमधील मायक्रो एसडी कार्ड मोबाइलला जोडूनही शब्दांच्या यादीत भर घालता येते.

‘कीबोर्ड माऊस इम्युलेटर’ हे हात नसलेल्यांसाठी तयार करण्यात आलेले जगातील पहिले उपकरण आहे, असा नेने यांचा दावा आहे. याची किंमत साधारण ९ हजार रुपये आहे.

‘कंट्रोल’ आणि ‘फंक्शन्स’ हे पर्याय निवडल्यास कंट्रोल प्लस ए, कंट्रोल प्लस सी, एफ वन, एफ टू, इत्यादी पर्याय स्क्रिनवर उपलब्ध होतात. लेखनात चिन्हांचा वापर करायचा असल्यास ‘सिम्बॉल’ पर्याय निवडता येतो. शिवाय ईमेल आयडी लिहिताना लावले जाणारे ‘अ‍ॅट जीमेल डॉट कॉम’, ‘अ‍ॅट याहू डॉट कॉम’ यांसारखे एक्स्टेन्शन्स इम्युलेटरमध्ये तयार स्वरूपात आहेत.