कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी कोकण रेल्वेने ‘श्रावण सेवा’ सुरू केली. यात रेल्वे गाडीच्या डब्यात सामान घेऊन चढताना तसेच उतरताना ज्येष्ठ नागरिकांना मदतनीस मदत करणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल, असा दावा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याने केला आहे.
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांनी प्रवास करताना जड सामान घेऊन डब्यात शिरताना किंवा उतरताना ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा काढत कोकण रेल्वेने ही सेवा सुरू केली आहे. यात कोकण रेल्वेने प्रवास करताना प्रवास सुरू होण्याआगोदर एका तासापूर्वी पीएनआर क्रमांक,भ्रमणध्वनी क्रमांक आणि आसन क्रमांक आदींची माहिती ९६६-४०४-४४५६ या क्रमांकावर पाठवायची आहे. ही सेवा मोफत असून सध्या चिपळूण, रत्नागिरी, शिवीम, करमाळी आणि मडगाव आदीं स्थानकांमध्ये उपलब्ध असल्याचे कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आले. ‘श्रावण सेवा’ योजनेचा आजपर्यंत दीड हजारापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.