मुंबई : आयआयटी बॉम्बेच्या परिसरात घटलेल्या वर्दळीने बिबटय़ाचा वावर वाढला असून अधिकारी आणि सुरक्षा रक्षकाला बिबटय़ाचे दर्शन झाले आहे.

आयआयटी बॉम्बेचा परिसर, पवई तलावाचा परिसर या भागांत बिबटय़ाचे दर्शन तसे नवे नाही. यापूर्वीही आयआयटीच्या परिसरात बिबटय़ा दिसला आहे. मात्र सध्या परिसरातील वर्दळ थंडावली आहे. त्यामुळे या परिसरात एखादवेळी दिसणारा बिबटय़ा संस्थेत आतपर्यंत वावरू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी सकाळी पावणेसातच्या सुमारास आयआयटीतील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकाला बिबटय़ाचे दर्शन झाले. या बिबटय़ाचा पाठलाग सुरक्षारक्षकाने केला.

मात्र, झाडीत पळून गेला. त्यापूर्वी पवई तलावाच्या आजूबाजूच्या काही भागांतही सतत बिबटय़ा दिसत असल्याच्या तक्रारी वनविड्टाागाकडे आल्या आहेत. वनविभागाने आयआयटीच्या परिसरात कॅमेरा लावले असून बिबटय़ाच्या हालचालींचा माग घेण्यात येत असल्याचे ठाणे वनविभाग उपवनसंरक्षक डॉ. जीतेंद्र रामगावकर यांनी सांगितले.