मराठा आरक्षणावरील अल्पकालीन चर्चा, प्रश्नोत्तरे, वेगवेगळ्या विभागांशी संबंधित १६ अहवाल सभागृहात सादर करणे, नियम ९३ ची निवेदने, ८ लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख, २७ विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व संबंधित मंत्र्यांची उत्तरे, हक्कभंगाचे प्रस्ताव, ९ विधेयके आणि विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव. असे भाराभार कामकाज कार्यक्रम पत्रिकेवर दाखविल्याने विधान पषिदेत सर्वपक्षीय सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या, शनिवारी संपणार आहे. त्याआधी उरलेल्या एक दिवसात भराभर कामकाज उरकून घेण्यासाठी जाडजूड कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली. सकाळी १० वाजता विशेष बैठकीने सभागृहाचे कामकाज सुरू झाले. मराठा आरक्षणावर चर्चा व उत्तर झाले. प्रश्नोत्तरे पार पडली. कार्यक्रम पत्रिकेवर आठ लक्षवेधी सूचना दाखविण्यात आल्या होत्या. त्यातील फक्त टोलबंसंधी एका लक्षवेधीवर चर्चा झाली व उरलेल्या लक्षवेधी सूचना उद्या घेण्यात येणार असल्याचे उपसभापती वसंत डावखरे यांनी जाहीर केले.
कामकाज भरपूर असल्याने ९३ ची निवेदने उद्या घेण्यात येतील, असे उपसभापतींनी सांगितले. त्यावर शिवसेनेचे रामदास कदम, दिवाकर रावते, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील यांनी उपसभापतींकडे नाराजी नोंदविली. जयंत पाटील यांनी तर उद्या अधिवेशन संपणार आहे मग एवढे कामकाज ठेवले कशाला, असा संतप्त सवाल केला. त्यावर उपसभापती वसंत डावखरे यांनीही सदस्यांच्या भावना रास्त असल्याचे मत व्यक्त करून कामकाज ठरविताना योग्य नियोजन असायला हवे, असे सांगितले.
कामकाजाचा बोजा जास्त आहे, यावर खल सुरु असतानाच अर्थ व नियोजन राज्य मंत्री राजेंद्र मुळक यांनी करविषयक विधेयक मंजूर करावे, अशी विनंती केली. त्यावरुनही वाद झाला. परंतु सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आधी पुरवणी मागण्यांवर चर्चा करावी व मग विधेयक घ्यावे, अशी सूचना केली. त्यानुसार पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. परंतु एकूणच शेवटच्या क्षणी कामकाज उरकून घेण्याच्या सरकारच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.