मुंबई : मुलुंडमधील राहुल नगर परिसरातील एका तरुणावर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री २ वाजता घडली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीला लागूनच राहुल नगर परिसर आहे. मध्यरात्री कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबटय़ाने या तरुणावर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला झालेल्या परिसरात वन विभागाकडून कॅमेरे लावण्यात आले असून रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त घालण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रानजीक असणाऱ्या मानवी वस्तीत वरचेवर बिबटय़ाचे दर्शन होत असते. राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड आणि ठाणे परिसरातील काही भागांमध्ये बिबटय़ांचा वावर असतो. तुळशी परिक्षेत्राला लागून असलेल्या मुलुंड येथील राहुल नगर परिसरातील रहिवासी सूरज गवई या तरुणावर शनिवारी मध्यरात्री बिबटय़ाने हल्ला केला. या हल्ल्यात सूरज जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर बांधलेला पाळीव कुत्रा जोरजोरात भुंकत असल्याने सूरज यांनी घराबाहेर धाव घेतली. त्या वेळी कुत्र्याला बिबटय़ाने पकडल्याचे त्यांना दिसले. त्याचवेळी बिबटय़ाने सूरज यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर आरडाओरड झाल्याने बिबटय़ाने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेतील सूरज यांना मुलुंडमधील स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले.

जंगलालगतच पाळीव प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबटे मानवी वस्तीत शिरतात. या वर्षी प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय उद्यानाच्या बिबटय़ा गणना अहवालामधून ही बाब उघड झाली आहे. बरेच बिबटे हे मानवी वस्तीत शिरून तेथील कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची शिकार करून जंगलामध्ये परतत असल्याचे निरीक्षण वन्यजीव संशोधकांनी नोंदविले आहे.

हल्ला झालेल्या परिसराची पाहणी  केली असून या परिसरात सात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांकडून गस्त घालण्यात येणार आहे.

– संतोष कंक, मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी

बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सूरजच्या डोळ्याखाली आणि डोक्यावर जखम झाली आहे. सध्या तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून उद्यापर्यंत त्याला सोडण्यात येईल.

– अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय