टाळेबंदी शिथिलीकरणात हॉटेल, उपाहारगृह आणि अन्य उद्योगधंद्यांना परवानगी मिळाली असली तरी सार्वजनिक ग्रंथालये खुली करण्यात अद्याप परवानगी मिळालेली नाही. ग्रंथालयांतील कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन मिळाले नसून ग्रंथालयांना सशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रंथालय चालकांनी केली आहे, तर राज्य सरकार ग्रंथालयांबाबत गंभीर नसल्याचा आरोप वाचकांकडून करण्यात आला आहे.

‘मॉल, हॉटेल, अशी गर्दीची ठिकाणे उघडण्यास सरकार परवानगी देऊ शकते, मग ग्रंथालयांनी काय चूक केली आहे’, असा प्रश्न ‘राज्य ग्रंथालय संघा’चे कार्याध्यक्ष शिवकुमार शर्मा विचारतात. ‘सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेला अनुदानाचा पहिला हप्ता ग्रंथालयांना न मिळाल्याने एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. वाचक रोज ग्रंथालयांच्या दारात येऊन उभे राहतात. पण याबाबत सरकार गंभीर नाही. ग्रंथालयांची सतत उपेक्षा होत आहे.’, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी व्यक्त केली.

‘टाळेबंदी हा वाचनासाठी उत्तम काळ होता. त्यामुळे ग्रंथालये बंद करणेच चुकीचे होते. ग्रंथालयांचे कार्यालय उघडले की वाचक येतात. पण पुस्तके  न मिळाल्याने निराश होऊन परत जातात. ग्रंथालयांमध्ये खरेतर फार गर्दी होत नाही. त्यामुळे आता ग्रंथालये सुरू व्हायला हवीत’, असे मत वध्र्याच्या ‘सत्यनारायण बजाज जिल्हा ग्रंथालया’चे अध्यक्ष प्रदीप बजाज यांनी व्यक्त केले. ‘सध्या लोक मुखपट्टी लावून बाहेर फिरतच आहेत, मग ग्रंथालयात यायला काय हरकत आहे. खरेतर ग्रंथालयांमध्ये फारशी गर्दी होतच नाही. त्यामुळे ती सुरू झाली पाहिजेत. मात्र, रेल्वेगाडय़ा बंद असल्याने कर्मचारी येणार कसे, हा प्रश्न आहेच’, असे ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’चे अधीक्षक सुनीलकुबल म्हणाले. ‘ग्रंथालये सुरू केल्यास अंतरनियमाचे पालन केले जाईल. आवश्यक तेथे घरपोच सेवा दिली जाईल. ग्रंथालयांना पुस्तक परत मिळाल्यानंतर दोन दिवस त्याला हात लावला जाणार नाही’, अशी ग्वाही ‘राज्य ग्रंथालय संघा’चे अध्यक्ष डॉ. रामेश्वर पवार यांनी दिली.

‘ग्रंथालये सुरू व्हावीत, अशी वाचकांची मागणी आहे. काही विद्यार्थी रोज अभ्यासिके च्या बाहेर पायऱ्यांवर वा पदपथांवर बसून अभ्यास करत आहेत. त्यामुळे वाचकहित लक्षात घेऊन ग्रंथालये सुरू व्हायला हवीत’, असे ‘राज्य ग्रंथालय संघा’चे प्रमुख कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार यांनी सांगितले.

ग्रंथालये सुरू करण्याबाबत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करून गेल्या आठवडय़ात उच्च शिक्षणमंत्री यांना दिली असता, ते ग्रंथालयांना परवानगी देण्याच्या तयारीत होते. पण मंत्री स्वत: करोनाबाधित झाल्याने पुढे काही होऊ शकले नाही.

– शालिनी इंगोले, प्रभारी ग्रंथालय संचालक