जुनागडमधील सिंहांची जोडी लवकरच प्राणिसंग्रहालयात

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

गुजरातमधील जुनागड येथील प्राणिसंग्रहालयातील सिंहांची जोडी लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीचा बाग) दाखल होणार आहे. पालिका प्रशासनाने त्याबाबतचा एक प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय नियामक मंडळाला सादर केला असून या प्रस्तावाला लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांमध्ये वनराजाची जोडी मुंबईकरांच्या दर्शनार्थ ‘राणीच्या बागे’त दाखल होईल.

देश-विदेशी पर्यटकांचे आकर्षण स्थान बनलेल्या मुंबईमधील ‘राणीच्या बागे’चे सुशोभीकरण आणि नूतनीकरणाच्या प्रकल्पाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या प्रकल्पांतर्गत देश-विदेशातील विविध प्राणी ‘राणीच्या बागे’त दाखल होणार आहेत. या प्रकल्पानुसार १८ देशी, तर पाच परदेशी असे एकूण २३ नवे प्राणी भविष्यात ‘राणीच्या बागे’त पाहायला मिळणार आहेत. त्यात तरस, कोल्हा, लांडगा, देशी अस्वल, रानकुत्रे, गवा, साळिंदर, माऊस डिअर, बाराशिंगा, सांबर, पाणमांजर, आशियाई सिंह, बंगाली वाघ, लेपर्ड कॅट, रानमांजर उदमांजर आदी भारतीय, तर एमू, पाणघोडा, जग्वार, झेब्रा, हम्बोल्ट पेंग्विन यांचा समावेश आहे. यांपैकी सर्वप्रथम हम्बोल्ट पेंग्विन ‘राणीच्या बागे’त दाखल झाले. हम्बोल्ट पेंग्विनचे आगमन झाल्यानंतर ‘राणीच्या बागे’त येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर पालिकेला ‘राणीच्या बागे’च्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. तसेच अलीकडेच मंगलोर येथील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातील बिबळ्या आणि कोल्ह्य़ाची जोडीही ‘राणीच्या बागे’त दाखल झाली.

आता पालिकेने गुजरातमधील जुनागड येथील साक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंहांची जोडी मुंबईत आणण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेने याबाबतचा एक प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय नियामक मंडळाला पाठविला असून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे, असे ‘राणीच्या बागे’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. केंद्रीय प्राणिसंग्रहालय नियामक मंडळाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच १५ ते २० दिवसांमध्ये जुनागढ येथून सिंहांची जोडी मुंबईमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

देवाणघेवाणीचा अडसर?

सिंहाच्या जोडीच्या बदल्यात जिराफ अथवा गिब्बन माकडाची मागणी साक्करबाग प्राणिसंग्रहालयाकडून करण्यात आली आहे. मात्र सिंहाच्या जोडीच्या बदल्यात जिराफ अथवा गिब्बन माकड देणे शक्य होणार नाही. त्यामुळे या संदर्भात साक्करबाग प्राणिसंग्रहालयातील उच्चपदस्थांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.