दिवाळीनंतर मुंबईतील वाढती करोना रुग्णसंख्या पाहता सर्वासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा मिळण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे. सर्वाना प्रवास परवानगी देण्याबाबत  रेल्वेला मात्र राज्य सरकारकडून विनंतीची प्रतीक्षा आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सर्वाना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने अद्यापही विचार केला नसल्याचे समजते. रेल्वे प्रशासनही राज्य सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहे. अशा परिस्थितीत सर्वाना चालू महिन्यात लोकल प्रवासाची मुभा मिळणे अशक्य असून डिसेंबरमध्ये त्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येते.

राज्य सरकारने २८ ऑक्टोबरला मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र पाठवून सर्वाना लोकल प्रवासाची परवानगी देत असल्याचे स्पष्ट करून रेल्वेची तयारी किती आहे, याची माहिती मागवली होती. रेल्वेनेही त्याच दिवशी राज्य सरकारला एकूण ८० लाख लोकल प्रवाशांपैकी २२ लाख प्रवाशांनाच प्रवास परवानगी देण्यात येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सर्वाना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात ना राज्य सरकारने पुढाकार घेतला, ना रेल्वेने. त्यानंतर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या.

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचा असलेला विरोध यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णयही फिरवावा लागला आहे. दिवाळीनंतर करोना रुग्णसंख्येत वाढ होईल, अशी चिंता राज्य सरकारने आधी व्यक्त केली होती.

सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण हजारावर

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या एक हजारावर गेली आहे. शनिवारी १०९२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १७ जणांचा मृत्यू झाला. सध्या ९,३२५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

उशिराचे कारण..

* मुंबई महानगरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तूर्तास सर्वाना लोकल प्रवासाची परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक नसल्याचे दिसते.

* वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वाना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी का याबाबत अंतिम निर्णय घेणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

* राज्य सरकारने लोकल प्रवासाबाबत बैठक बोलावली नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सध्या १२ लाख प्रवासी

सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर १,५८० लोकल फेऱ्या होतात आणि सहा लाख प्रवासी प्रवास करतात, तर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर १,२०१ फेऱ्या होतात आणि त्यांतूनही सुमारे सहा लाख प्रवासी प्रवास करतात.

रेल्वेने जवळपास ९० टक्के उपनगरीय रेल्वे गाडय़ा सुरू केल्या आहेत. राज्य सरकारने सर्वासाठी रेल्वे परवानगी देण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्याशी समन्वय साधून निर्णय घेतला जाईल.

– शिवाजी सुतार, मध्य रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी