मुंबई : अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरू असल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. सामान्य जनतेसाठी निदान दोन-चार तास तरी लोकल ट्रेन सुरू करा, या मागणीसाठी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने मंगळवारी मुंबईत विनातिकीट लोकल प्रवास आंदोलन करण्यात आले.

जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवी भिलाणे, मुंबई महासचिव ज्योती बडेकर आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान पक्ष प्रतिनिधींनी मुंबईच्या विविध भागांत विनातिकीट लोकल प्रवास केला. त्यानंतर पक्षाच्या वतीने चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयात महाव्यवस्थापकांना मागणीचे निवेदन देण्यात आले. रेल्वे प्रशासनाने ही मागणी सरकापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ज्योती बडेकर यांनी दिली.