News Flash

२०१४ चा विक्रम मोडीत!

सकाळी मतदान केंद्रासमोर दिसणाऱ्या रांगा अनेक भागांमध्ये दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र काहीशा आटल्या

सर्वच मतदारसंघांत निम्म्याहून अधिक मतदान; सकाळचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम

मुंबई : मुंबईकरांनो पुणेकरांचा कित्ता गिरवू नका.. मतदानाकडे पाठ फिरवू नका..पाच वर्षांतून एकदाच मिळणाऱ्या मताधिकाराचा वापर करा.. भरभरून मतदान करा आणि आपला हक्क बजावा.. मतदारराजाला जागविण्यासाठी काही संस्था आणि तरुणांनी केलेल्या जागराला मुंबईकरांनीही सोमवारी सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणात, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि मतदानाचा हक्क बजावला. मुंबईकरांचा हा उत्साह मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होता.

पुण्यातील मतदारांनी मतदानाकडे फिरवलेली पाठ, उन्हाचा चढता पारा, त्यामुळे अंगाची होणारी लाही-लाही, त्यातच शनिवार-रविवारला लागून सोमवारी आलेली मतदानाची सुट्टी या पाश्र्वभूमीवर मुंबईकर मतदानासाठी उतरणार का? अशी शंकेची पाल शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मुंबईतील सहाही मतदारसंघातील उमेदवारांच्या मनात चुकचुकत होती. दुसरीकडे मात्र पुणेकरांच्या वाटेला मतदान न केल्याने आलेली नाचक्की मुंबईकरांच्या वाटेला येऊ नये म्हणून काही संस्था आणि तरुण मुंबईकरांनी विविध मार्गाचा वापर करत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन मुंबईकरांना केले. त्यासाठी काहींनी एक डझन आंब्यांवर एक डझन आंबे मोफत, काहींना केशकर्तनावर सवलती जाहीर केल्या, तर काहींनी येणाऱ्या-जाणाऱ्या मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक  कार्यालयाकडून फ्लॅश मॉब, जाहिरात, पथनाटय़ अशा विविध प्रकारे जनजागृती मोहीम हाती घेतली होती. एवढय़ा सगळ्या प्रयत्नांनंतर मुंबईकर खरोखर मतदानासाठी उतरतील का, हा प्रश्न होताच.. मात्र मुंबईकरांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्या आणि भरभरून, उत्स्फूर्तपणे मतदान करत सगळ्याच शंकांना तिलांजली दिली. काही दिवसांपासून सूर्य आग ओकल्याप्रमाणे तळपत आहे. चढत जाणारा उन्हाचा पारा आणि त्यामुळे अंगाची होणारी लाही लाही, घामाच्या धारा यामुळे तरी निदान मुंबईकर मतदानाला उतरणार नाहीत, अशीही शंका व्यक्त करण्यात येत होती. तीही मुंबईकरांनी खोटी ठरवली. उलट दुपारची वेळ वगळता मुंबईकरांनी मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला.

दुपारनंतर पुन्हा जोर

सकाळी मतदान केंद्रासमोर दिसणाऱ्या रांगा अनेक भागांमध्ये दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र काहीशा आटल्या. दुपारी १ वाजेपर्यंत या मतदारसंघात साधारण २९ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीननंतर मात्र पुन्हा मतदानाचा उत्साह वाढला आणि केंद्रासमोरील रांगा पुन्हा वाढू लागल्या. कुर्ला, वांद्रे पूर्व या भागांतील काही केंद्रांवर मात्र सकाळपासून अविरत मतदान सुरू होते. ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जात होते. पूर्वी राहात असलेल्या किंवा एकत्र घर असलेल्या भागांत अनेकांची नावे होती. त्यामुळे वेळा ठरवून, सगळे कुटुंबीय एकत्र मतदान करण्यासाठी हजेरी लावत होते. जुने शेजारी, नातावाईक यांचे स्नेहमेळावेच रंगले होते.

सेलेब्रिटींचाही उत्साह

सकाळी परिसरातील नेते, सेलेब्रिटी यांच्या मतदानाने सुरू झालेल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात दुपारनंतर मतदानाचा उत्साह वाढला. या मतदारसंघात वांद्रे, विलेपार्ले अशा काहीशा उच्चभ्रू म्हणवणाऱ्या परिसराचाही समावेश आहे. या भागांत अनेक ठिकाणी सकाळी सेलेब्रिटी आणि नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय, उत्तर मुंबईच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर, शाहरूख खान, सलमान खान, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले. जावेद अख्तर, शबाना आझमी, प्रीती झिंटा, सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ कवी गुलजार यांसह कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील नामवंतांनी मतदानाचा हक्क बजावला. काही सेलेब्रिटींनाही रांगेत पाहण्याची उत्सुकता मतदारांमध्ये होती. सेलेब्रिटी कधी मतदान करणार आहेत, एखाद्या अभिनेत्याचे मतदान झाले का? अशा चौकशा पक्षांनी थाटलेल्या बूथवर मतदार करत होते.

बूथवरील गर्दी घटली

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची शहानिशा करण्याची सोय निवडणूक आयोगाने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केली होती. त्यामुळे बहुतांश मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची भ्रमणध्वनीवरूनच शहानिशा केली होती. त्यामुळे पहिल्यांदाच मतदान केंद्राबाहेरील राजकीय पक्षांनी थाटलेल्या बूथवर मतदारांची गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:47 am

Web Title: lok sabha election 2019 big enthusiasm among the voters in mumbai
Next Stories
1 मतदारसंघ ईशान्य मुंबई : मतदारांचा उत्साह आणि अफवांना ऊत
2 मतदारसंघ दक्षिण मुंबई : अमराठी मतदारांची गर्दी
3 मतदारसंघ वायव्य मुंबई : उन्हाची पर्वा न करता मतदानाचे कर्तव्य
Just Now!
X