मतमोजणी केंद्रांवर भाजप, शिवसेनेचा विजयोत्सव; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मात्र काढता पाय

मतमोजणी केंद्रांवर सुरुवातीच्या काही फेऱ्यांतच कल स्पष्ट होऊ लागले आणि फेरीगणिक भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढू लागताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी आधीच तुरळक होती. कल स्पष्ट होऊ लागताच त्यांनी मतमोजणी केंद्रांवरून काढता पाय घेतला. मतमोजणी केंद्रांवरील गर्दीला उन्हाच्या झळांचा काही प्रमाणात फटका बसल्याचे दिसले. मात्र, निकाल जाहीर होताच उन्हाची तमा न बाळगता विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करताना दिसले.

विक्रोळीत तासाभरातच चित्र स्पष्ट ; कार्यकर्त्यांचा आपापल्या परिसरात जल्लोष; मतदानकेंद्राबाहेर शुकशुकाट

मुंबई : मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या तासातच विजयाची चाहूल लागल्याने ईशान्य मुंबईतील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी येथील मतमोजणी केंद्रावर जाण्याऐवजी आपापल्या भागातच जल्लोषाची तयारी सुरू केली. दुपारी दीडच्या सुमारास महायुतीचे विजयी उमेदवार मनोज कोटक केंद्रावर आले तेव्हाच वर्दळ सुरू झाली. मात्र, उर्वरित वेळ केंद्राबाहेर शुकशुकाट होता.

ईशान्य मुंबईत २४ फेऱ्यांमध्ये नऊ लाखांहून अधिक मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक आघाडीवर होते. पाचव्या फेरीपर्यंत महाआघाडीचे उमेदवार संजय पाटील कोटक यांचा पाठलाग करताना दिसले. त्यामुळे लढत चुरशीची, अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सहाव्या फेरीत कोटक यांनी ५० हजारांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये पाटील आणि कोटक यांच्यातील मतांची दरी वाढत गेली. फरक दोन लाखांपुढे गेला.

वृत्तवाहिन्यांवर निकालाचे वार्ताकन सुरूच होते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही देशातील प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी घरबसल्या वेगाने उपलब्ध होत होती. केंद्रावर पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला तेव्हा संकेतस्थळावर आठव्या फेरीपर्यंतच्या मतांची आकडेवारी जाहीर झाली होती. महायुतीच्या कार्यकर्त्यांना पहिल्या दोन तासांतच विजयाची चाहूल लागली. त्यामुळे उन्हात शक्तिप्रदर्शन करण्याऐवजी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जल्लोषाची तयारी सुरू केली.

दुपारी दीडच्या सुमारास ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक विक्रोळी केंद्रावर आले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर आले होते. कार्यकर्त्यांनी कोटक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला. पेढे, लाडू वाटून तोंड गोड केले. घाटकोपर, मुलुंड, भांडुपमध्ये अंतिम निकाल जाहीर होण्याआधीच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली होती. विरोधकांना जनतेने जागा दाखवून दिली, असा टोला कोटक यांनी प्रतिस्पर्धी संजय पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

शिवडीत शिवसैनिकांचा गजर

मुंबई : वाढत्या उन्हाबरोबरच शिवडीच्या गाडी अड्डय़ाजवळ शिवसैनिकांची गर्दी वाढत होती. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीच्या घोषणा ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होत्या. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय पक्का होताच ढोल-ताशाच्या तालावर घोषणाबाजी सुरू झाली. काँग्रेसच्या मंडपात मात्र शुकशुकाट झाला.

एरव्ही ट्रक, बसगाडय़ा, कंटेनर ट्रेलर आणि अन्य अवजड वाहनांच्या वर्दळीने गजबजून जाणाऱ्या शिवडी (पूर्व) येथील एम. एस. रोडवरील न्यू शिवडी वेअर हाऊसमध्ये गुरुवारी सकाळपासूनच शिवसेना, भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांची वर्दळ होती. कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत निवडणूक आयोगाने शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र मंडप उभारले होते. शिवसेना-भाजप युतीचे दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांचे पारडे जड होऊ लागताच मतमोजणी केंद्राबाहेरील शिवसेनेच्या मंडपात जल्लोष सुरू झाला. ढोल-ताशाच्या गजरात भगवा ध्वज फडकवत घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी सारा परिसर दणाणून टाकला.

मतमोजणी सुरू होताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरील मंडपात हजेरी लावली होती, पण जसजसा मतमोजणीचा कौल जाहीर होऊ लागला तसतशी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील धाकधूक वाढू लागली. स्वपक्षाच्या उमेदवारांचा पराभव होण्याची चिन्हे दिसू लागताच हळूहळू काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंडपातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. त्याच वेळी शिवसैनिकांचा जल्लोष सुरू झाला. काँग्रेसच्या मंडपात मात्र शुकशुकाट झाला.

‘व्हिडीओ दाखविणाऱ्यांना उत्तर’

‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेकांनी व्हिडीओ दाखवले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जनतेने या व्हिडीओंना चोख उत्तर दिले,’ असा टोला शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे यांना लगावला. मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. वंचित आघाडीमुळे काँग्रेसला फटका बसल्याचेही त्यांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त

मतमोजणी केंद्रात कडेकोट बंदोबस्त होता. पत्रकार कक्ष आणि मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका होती. ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. पत्रकार कक्षामध्ये भल्यामोठय़ा स्क्रीनवर दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणीचा कौल दाखविला जात होता. तसेच एकेका फेरीचा निकालही जाहीर करण्यात येत होता. अधूनमधून पत्रकारांना मतमोजणी केंद्रात केवळ पाहणीसाठी सोडण्यात येत होते. मात्र तिथे मोबाइल फोन नेण्यास मनाई करण्यात आली होती.

दक्षिण मध्य मुंबईवर भगवा फडकावा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. हा विजय केवळ माझ्या एकटय़ाचा नसून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे जनतेने मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या अपेक्षा येत्या पाच वर्षांत पूर्ण करणार.

– राहुल शेवाळे, दक्षिण मध्य मुंबई

कार्यकर्ते ताटकळले ; गोरेगाव येथे तीन मतदारसंघांची मतमोजणी

मुंबई : उत्तर मुंबई, उत्तर मध्य आणि वायव्य मुंबई या तीन मतदारसंघांची मतमोजणी गोरेगावच्या नेस्को मैदानात झाली. या तीन मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या सर्वाधिक १८ ते २५ फेऱ्या पार पडल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना बराच वेळ प्रतीक्षा कारावी लागली.  मैदानाबाहेरील मार्गिका पूर्ण बंद केल्यामुळे एरव्ही रहदारीचा असलेला हा रस्ता मोकळा होता. फक्त पोलीस आणि मोजकेच कार्यकर्ते उभे होते.

उत्तर मुंबईतील भाजपचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, वायव्य मुंबईतील युतीचे गजानन कीर्तिकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम तर उत्तर मध्य मुंबईतील भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त अशा सहा प्रमुख उमेदवारांसह ५४ उमेदवारांचे भवितव्य तेथील मतपेटय़ामध्ये बंद होते. एकूण तीन मतदारसंघांचे निकाल या केंद्रावरून जाहीर होणार असल्यामुळे कार्यकर्त्यांना एकेका निकालासाठी खूप वेळ थांबावे लागत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ चार फेऱ्यांचे निकाल ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ऊन वाढू लागल्यामुळे हळूहळू केंद्राबाहेरची गर्दी पांगू लागली. प्रचंड उन्हामुळे मतदान केंद्राबाहेर अक्षरश: शुकशुकाट होता. कुठेतरी बसस्टॉप किंवा झाडाच्या सावलीत थांबलेले कार्यकर्ते ध्वनिक्षेपक सुरू होताच सावध होऊन  कागद, पेन, मोबाईल घेऊन निकाल नोंदवून घेत होते.

दुपारी एक वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले नसले तरी चित्र स्पष्ट झाले होते त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. तर युतीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघांत जल्लोषाची तयारी सुरू केली. मतदान केंद्राच्या बाहेर थांबलेले कार्यकर्ते केवळ अधिकृत घोषणेची वाट पाहत होते.