‘लोकसत्ता‘च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र‘ या उपक्रमातंर्गत राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमधील घडामोडींचा विविध तज्ज्ञांकडून वेध घेतला जाणार आहे.

सोमवारी होणाऱ्या या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते होणार असून, समारोप जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होईल. विविध सनदी अधिकारी आणि कृषी, पायाभूत सुविधा तसेच उद्योग क्षेत्रांतील तज्ज्ञ या परिषदेत विचारमंथन करणार आहेत.

राज्याची सुमारे ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त लोकसंख्या ही कृषी किंवा कृषीवर आधारित उद्योगांवर अवलंबून असताना निसर्गाच्या लहरीपणाचा राज्याच्या कृषी क्षेत्राला फटका बसला. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने कृषी क्षेत्राची पिछेहाट झाली होती. शेती विकासाचा दर वाढविण्यापासून ते शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल.

पायाभूत सुविधांच्या विकासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भर दिला आहे. मेट्रो, रस्ते, पूल अशी पायाभूत सुविधांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीची कोंडी सोडविणे हे मोठे आव्हान आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी अशा शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. मेट्रोच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. वाहतुकीचे नवे माध्यम म्हणून मेट्रोला प्राधान्य देण्यात आले आहे. वाहतूक कोंडीवर कसा मार्ग काढता येईल तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती कशी करता येईल याचा ऊहापोह या परिषदेत केला जाईल.

देशात उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे. विदेशी गुंतवणुकीत अजूनही महाराष्ट्र आघाडीवर आहे. विदेशी तसेच देशी उद्योजकांची गुंतवणुकीकरिता महाराष्ट्रालाच पसंती असते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला अन्य राज्यांनी आव्हान दिले आहे. उद्योग क्षेत्रातील घडामोडी आणि राज्य अधिक प्रगती कशी करेल याचा वेध या परिषदेत तज्ज्ञांकडून घेतला जाईल.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास या विषयांतील संबंधितांनी events.loksatta@expressindia.com या ई-मेलवर नावे नोंदवावीत. निवडक इच्छुकांनाच कार्यक्रमात प्रवेश देण्यात येईल.

प्रायोजक.. : ‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.