अन्य विभागांतील फेऱ्या १ डिसेंबरपासून

तरुण कलावंतांच्या नाटय़जाणिवा जोपासणारी आणि चौकटीपलीकडचा विचार करण्याची प्रेरणा त्यांच्यात रुजवणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची नांदी रविवारी निनादणार आहे. मुंबई विभागापासून ही फेरी सुरू होत असून अन्य विभागांतील प्राथमिक फेऱ्यांना एक डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार आहे.

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ची नाटय़धुमाळी ही सर्वार्थाने वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण ठरणार आहे. तरूणांच्या नाटय़गुणांना दिशा देणाऱ्या या एकांकिका स्पर्धेत यंदा स्वत: रंगभूमीपासून अभिनयाचे धडे गिरवलेला बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांचे अनुभव आणि विचार ऐकता येणार आहेत. त्याचबरोबर लोकांकिकाच्या मंचावर रंगणारा हा अनोखा नाटय़विष्कार यावर्षी झी मराठी वाहिनीवर पाहताही येणार आहे. अस्तित्वच्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या एकांकिका स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर म्हणून तर एबीपी माझा हे न्यूज पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. या स्पर्धेच्या सर्वसाधारण स्वरूपाप्रमाणे राज्यभरातील आठ विभागांमधील स्पर्धा केंद्रातून पहिल्यांदा प्राथमिक फेरी, त्यानंतर विभागीय अंतिम फेरी आणि सर्वात शेवटी महाअंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून लोकसत्ता लोकांकिकाचा बहुमान स्पर्धकांना जिंकता येणार आहे.

गेला महिनाभर या स्पर्धेसाठीची नोंदणी, त्यानंतर संहिता निवडून तालमी पूर्ण करून तयारीत असलेले मुंबईतील तरुण नाटय़कर्मी ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण आता त्यांच्यासमोर येऊन ठेपला आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मुंबईतून रविवार (आज)पासून सुरूवात होत असून यावेळी स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शनचे विद्याधर पाठारे आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी खास उपस्थित राहणार आहेत. एरेना मल्टीमीडिया हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत.

प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी अशी एकामागोमाग एक आव्हाने पूर्ण करीत महाअंतिम फेरीत चुरशीचा नाटय़सामना खेळताना तरुणाईला थेट अभिनेता मनोज वाजपेयी यांचे विचार ऐकता येणार आहेत. बँडिट क्वीन, सत्या, राजनीती, गँग्ज ऑफ वासेपूर, स्पेशल छब्बीस, अलीगढ अशा वेगळ्या विषयांवरील चित्रपटांतून आणि अनेक व्यावसायिक चित्रपटांतूनही आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिकांचे सोने करत नावलौकिक मिळवणाऱ्या मनोज वाजपेयी यांचे विचार नक्कीच नवी दिशा देणारे ठरतील. ‘पिंजर’ चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या अभिनेत्याने प्रकाश झा, अनुराग कश्यप, हन्सल मेहता, नीरज पांडे यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांसमवेत काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचे बोल म्हणूनच ग्लॅमरच्या क्षेत्रात आपले नाणे खणखणीत वाजवण्याचे ध्येय बाळगून असलेल्या तरूण पिढीसाठी महत्वाचे ठरणार आहेत.

विभागीय प्राथमिक फेरी वेळापत्रक आणि संपर्क..

  • ठाणे – १ आणि २ डिसेंबर -मिलिंद दाभोळकर (९१६७२२१२४६), सुभाष कदम (९७६९३६८१११)
  • नाशिक – ७ आणि ८ डिसेंबर -वंदन चंद्रात्रे (९४२२२४५०६५)
  • रत्नागिरी -४ डिसेंबर – हेमंत चोप्रा (९४२००९५१०४)
  • पुणे -१ आणि २ डिसेंबर -अमोल गाडगीळ (९८८१२५६०८२)
  • कोल्हापूर- १० आणि ११ डिसेंबर -दीपक क्षीरसागर (९८८१२५६०४९)
  • औरंगाबाद -३ आणि ४ डिसेंबर -शिवा देशपांडे (९९२२४००९७६)
  • नागपूर- २ आणि ३ डिसेंबर – गजानन बोबडे (९८२२७२८६०३)

स्पर्धा अशी होईल.

मुंबईतील पहिल्या विभागीय प्राथमिक फेरीनंतर ठाणे आणि पुणे (१ आणि २ डिसेंबर), नागपूर (२ आणि ३ डिसेंबर), औरंगाबाद (३ आणि ४ डिसेंबर),  रत्नागिरी (४ डिसेंबर),  नाशिक (७ आणि ८ डिसेंबर) आणि कोल्हापूर (१० आणि ११ डिसेंबर) असे वळण घेत ही स्पर्धा विभागीय अंतिम फेरीच्या टप्प्यावर थोडी विश्रांती घेईल. त्यानंतर ८ ते १३ डिसेंबरदरम्यान विभागीय अंतिम फेरीच्या माध्यमातून हा प्रवास वेग घेईल. त्यात निवड झालेल्या सवरेत्कृष्ट आठ विभागीय एकांकिकांमधून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाईल.