‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१७’ची सुरुवात; ५१,००१ रुपयांचे भव्य पारितोषिक; प्रवेशिका १९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध

गणरायाचे आगमन अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपले आहे. त्याच्या स्वागताची लगबग सगळीकडे सुरू झाली आहे. गणपतीची मूर्ती, त्याच्यासाठी मंडप, देखावा, सजावट, पूजेचे साहित्य अशी एकापाठोपाठ एक कामाच्या यादीवर टिक करत ते पूर्ण करण्याची धडपड गणेशमंडळांमध्ये सुरू असेल. या गडबडीतही ‘मुंबईचा राजा’चा मान मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१७’साठी नावनोंदणी करायला विसरू नका! दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेची दणक्यात सुरुवात झाली असून ५१,००१ रुपयाचे भव्य पारितोषिक मिळवून देणाऱ्या या स्पर्धेच्या प्रवेशिका उपलब्ध झाल्या आहेत.

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१७’चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा सन्मान आणि ५१,००१ रुपयांचा भव्य पुरस्कार दिला जाणार आहे. व्ही. पी. बेडेकर अँड सन्स सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘अ‍ॅलेन आयूर’ असलेल्या या स्पर्धेच्या प्रवेशिका १९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असून २१-२२ ऑगस्टपर्यंत त्या सादर करायच्या आहेत. या स्पर्धेत कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई (शहर) या विभागातील मंडळे सहभागी होऊ  शकतील.

पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना याबरोबरच जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील जनजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाने वर्षभरात केलेले उपक्रम, सामाजिक काम, गणेशमूर्ती देखावा, विषयांची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, सजावटीचा विषय, मंडळाकडून ठेवली जाणारी स्वच्छता, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिवर्धकाचा आवाज याचाही विचार केला जाणार आहे.  या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत. पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार असून सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वैयक्तिक २,५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.